बोर्डाच्या परीक्षेत कॉप्यांचा पाऊस ; छत्रपती संभाजीनगरने रेकॉर्ड मोडले, कोल्हापूर-कोकण कॉपी मुक्त

छत्रपती संभाजी नगर विभागाने कॉपी प्रकरणात स्वतःचे रेकॉर्ड मोडले. दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर व कोकण विभाग कॉपीमुक्त झाला

बोर्डाच्या परीक्षेत कॉप्यांचा पाऊस ; छत्रपती संभाजीनगरने रेकॉर्ड मोडले, कोल्हापूर-कोकण कॉपी मुक्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary)घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत (10th-12th Exams) छत्रपती संभाजीनगर बोर्डाने (Chhatrapati Sambhajinagar Board)गैरप्रकार करण्याबाबतचे आपले विक्रम मोडीत (Breaking records)काढले आहेत. तर इयत्ता दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर व कोकण विभाग कॉपीमुक्त (Kolhapur and Konkan division copy free)झाला आहे. यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात एकूण 446 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. बारावीला 306 तर दहावीला 140 विद्यार्थ्यांना कॉपी केल्या प्रकरणी पकडले.

राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य मंडळाने  कॉपीमुक्त अभियान राबविले होते. केवळ शिक्षण विभागच नाही तर महसूल विभागही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र इयत्ता दहावीच्या परीक्षेत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक गैरप्रकारच्या घटना घडल्या.  2023 मध्ये राज्यात 116 विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार करताना पकडले होते. यावर्षी ही संख्या 140 पर्यंत वाढली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे कोल्हापूर व कोकण विभागात इयत्ता दहावीला एकही गैरप्रकार घडल्याचे आढळून आले नाही.

बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्यात यंदाही छत्रपती संभाजी नगर विभाग आघाडीवर असल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगर विभागात 2023 मध्ये 111 विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडले होते.  2024 मध्ये ही संख्या तब्बल 142 पर्यंत वाढली. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर विभागाने कॉपी प्रकरणात स्वतःचे रेकॉर्ड मोडले आहेत . इयत्ता दहावीच्या परीक्षेत सुद्धा छत्रपती संभाजीनगर प्रथम क्रमांकावर होता. यंदा या विभागात 68 विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडण्यात आले आहे. मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 30  विद्यार्थी गैरप्रकार प्रकरणी पकडले होते. गैरप्रकारात इयत्ता बारावी परीक्षेमध्ये औरंगाबाद पहिल्या क्रमांकावर असून पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे पुण्यात एकूण 68 विद्यार्थी कॉपी करत असल्याचे आढळून आले.

परीक्षेत गैरप्रकारे करणारे विद्यार्थी (विभाग निहाय-2024) 

विभाग                              दहावी            बारावी
पुणे                                  19                   68 
नागपूर                              13                 18 
 छत्रपती संभाजीनगर            86                142 
मुंबई                                 01                  11 
 कोल्हापूर                         00                  03 
अमरावती                         05                   11 
नाशिक                             06                  23 
लातूर                                10                  26 
कोकण                              00                 01