बनावट डिग्री सापडल्याने विद्यापीठाचे अधिकारी चक्रावले; तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धावले

जाधव वैभव सुभाष या विद्यार्थ्यांच्या नावे ही बनावट डिग्री तयार करण्यात आली आहे. हा विद्यार्थी 2018 मध्ये 'बॅचलर ऑफ वाणिज्य' पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे

बनावट डिग्री सापडल्याने विद्यापीठाचे अधिकारी चक्रावले; तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धावले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Pune University bogus degree news: गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यात विद्यापीठात बुधवारी एका विद्यार्थ्याची डिग्री बनावट (bogus degree)आल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली.त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी (officers of exam department) चक्रावून गेले आणि संबंधित विद्यार्थ्याला घेऊन थेट पोलीस चौकीत दाखल झाले. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठातील वसतिगृहात गांजा सापडल्याचे प्रकरण ताजे असताना विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे तपासणीसाठी आलेल्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये एक सर्टिफिकेट बनावट असल्याची बाब बुधवारी परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. विविध शासकीय कार्यालयात व खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून केली जाते.त्यात दौंड तालुक्यातील के.जी. कटारिया कॉलेज येथील एका विद्यार्थ्याचे डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठाकडे तपासणीसाठी आले होते. मात्र, संबंधित सर्टिफिकेट बनावट असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना तपासणीतून आढळून आले. 

बनावट डिग्री प्रकरणी मोठी अपडेट: Eduvarta exclusive:विद्यापीठ बोगस डिग्री रॅकेट? डिग्री सोबत तीनही वर्षांच्या गुणपत्रिका बोगस

विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठात बोलावून घेतले. त्याच्याकडे असणारे सर्टिफिकेट व विद्यापीठाकडे तपासणीसाठी दिलेले सर्टिफिकेट एकसारखे व बनावट असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यासाठी धाव घेतली. संबंधित विद्यार्थ्यालाही पोलीस चौकीत घेऊन गेले.मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या संदर्भात पोलिसांकडे गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

जाधव वैभव सुभाष या विद्यार्थ्यांच्या नावे ही बनावट डिग्री तयार करण्यात आली आहे. हा विद्यार्थी 2018 मध्ये 'बॅचलर ऑफ वाणिज्य' पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला विद्यापीठाची अधिकृत मुद्रा अंकित केलेले प्रमाणपत्र दिले जात आहे ,असा उल्लेख या बनावट डिग्री प्रमाणपत्रावर करण्यात आला आहे. विद्यापीठाकडून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झाली झालेली नाही, असे समजते आहे.

संबंधित विद्यार्थी केवळ परीक्षा देण्यासाठी दौंड येथील महाविद्यालयामध्ये जात होता. त्याला ही डिग्री पोस्टाने घरपोच मिळाली होती, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे. त्यामुळे ही बनावट डिग्री कोणी तयार केली? याचा विद्यापीठातील परीक्षा विभागाशी किंवा दौंड येथील कटारिया महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांशी काय संबंध आहे? हे तपासल्यानंतरच संबंधित बनावट डिग्री कोणी तयार केली याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.