विद्यार्थीनींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेचे उपाय करा; विद्यापीठाच्या 'त्या' निर्णयाला संघटनांचा विरोध

विद्यार्थीनींना सायंकाळी सातच्या आत वसतिगृहात हजर राहण्याचे आदेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.

विद्यार्थीनींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेचे उपाय करा; विद्यापीठाच्या 'त्या' निर्णयाला संघटनांचा विरोध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) प्रशासनाने विद्यार्थीनींना सायंकाळी सातच्या आत वसतिगृहात हजर राहण्याचे आदेश (Orders to be present at the hostel within seven)  दिले आहेत. मात्र, वसतिगृहातील विद्यार्थिनी (Hostel student) काही सहावी-सातवीला नाहीत. मुलींना वसतिगृहात कोंडून ठेवण्यापेक्षा सुरक्षेसाठी इतर उपाय योजले पाहिजेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून (Student Union) करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.   

विद्यापीठात दोन महिन्यांपूर्वी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार पोलीस  प्रशासनालाही एक पत्र लिहीत विद्यापीठ परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. त्यात विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींना ठरवून दिलेल्या सात वाजेनंतर वसतिगृहाच्या बाहेर जाऊ देऊ नये, असे सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभागाने विद्यार्थी कल्याण संचालकांना पत्र पाठवून पोलिसांच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले.

मुलींच्या वसतिगृह वाॅर्डनला पत्र पाठवून सात वाजेच्या नंतर कोणालाही बाहेर सोडण्यात येऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच काही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंमलबजावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यास विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.