पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 डिसेंबरपासून घेण्याचे नियोजन 

येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक व हॉल तिकीट तयार केले जाणार आहेत.परिणामी या विद्यार्थ्यांना  येत्या 1 नोव्हेंबरपासून नियमीत विद्यार्थ्यांबरोबर परीक्षा देता येईल,असे विद्यापीठाचे नियोजन आहे.

पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 डिसेंबरपासून घेण्याचे नियोजन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना (Savitribai Phule Pune University PRN Block Students) परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.मात्र, या विद्यार्थ्यांची परीक्षा केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी युध्द पातळीवर सुरू केली असून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक व हॉल तिकीट (Seat number and hall ticket) तयार केले जाणार आहेत.परिणामी या विद्यार्थ्यांना  येत्या 1 नोव्हेंबरपासून नियमीत विद्यार्थ्यांबरोबर परीक्षा देता येईल,असे विद्यापीठाचे नियोजन आहे,अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ.महेश काकडे (Director Dr. Mahesh Kakde) यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना दिली. 

सत्र पूर्ततेचा कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने परीक्षेच्या दोन संधी देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे सुमारे 88 हजार विद्यार्थ्यांना अपूर्ण राहिलेली पदवी पूर्ण करण्याचे स्वप्न अस्तित्वात आणण्याची संधी उपलब्ध झाली.सध्या या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले जात आहेत.येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले जाणार आहेत.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.परंतु, त्यांना अद्याप हॉल तिकीट मिळाले नाही.त्यामुळे आपली परीक्षा नेमकी केव्हा घेतली जाणार ? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे.मात्र, आता त्यावर लवकरच स्पष्टता येणार आहे.

हेही वाचा : प्राध्यापकांकडे बनावट सेट-नेट प्रमाणपत्र; पडताळणीत धक्कादायक माहिती समोर, 'युजीसी'चे पत्र

पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यात आली आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जराही वेळा वाया न घालता अभ्यास करावा,असा सल्ला वेळोवेळी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता.तसेच काही विद्यार्थ्यांनी आमची परीक्षा नियमित विद्यार्थ्यांबरोबरच घ्यावी,अशी मागणी केली होती.त्यानुसार विद्यापीठाने येत्या 1 डिसेंबर पासून  या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.तसेच 21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जर काही विषयांच्या परीक्षा झाल्या असलीत तर या विषयांचे पेपर नंतर घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.त्यामुळे पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांची परीक्षेची पहिली संधी डिसेंबर महिन्यात उपलब्ध करून दिली जात आहे.