कला, क्रीडा, संगणक शिक्षकांच्या कंत्राटी नियुक्तीचा मार्ग मोकळा..

राज्य  शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाळेत पूर्वीप्रमाणे कला-क्रीडा, संगणक शिक्षकांची पुर्नवियुक्ती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्यामुळे ८३६ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे.

कला, क्रीडा, संगणक शिक्षकांच्या कंत्राटी नियुक्तीचा मार्ग मोकळा..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मागील वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या (Art, Sports and Computer Teacher) नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. आदिवासी विकास विभागाने (Department of Tribal Development) या शिक्षकांच्या नियुक्ता कंत्राटी पद्धतीने (Appointment on contractual basis) करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य  शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाळेत (Integrated Tribal Development Project School) पूर्वीप्रमाणे कला-क्रीडा, संगणक शिक्षकांची पुर्नवियुक्ती देण्यात द्यावी, या मागणीसाठी उमेदवारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले तर काहींनी थेट न्यायालयाचा मार्ग अवलंबला त्यामध्ये त्यांना यश आले.  या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पूर्वीच्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्यामुळे ८३६ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे. 

आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाळेत ८३६ शिक्षक मागील ३ वर्षापासून राज्यभरात कार्यरत होते. परंतू २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात त्यांना कमी करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुर्वीप्रमाणे कला-क्रीडा, संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली त्याला आज अखेर पूर्णविराम मिळाला असला आहे. 

राज्यातील ८३६ शिक्षकांमध्ये कला २५२, क्रीडा ३४०, तर संगणक २४४ शिक्षकांचा समावेश आहे. ही नियुक्ती केवळ सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८ मध्ये ३४० क्रीडा शिक्षकांची, तर २०१९ मध्ये २६० कला आणि २३६ संगणक शिक्षकांची ३३ महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. 

या शिक्षकांना कोविडनंतरही नियुक्ती आदेश देण्यात आले. कंत्राटी ८३६ शिक्षकांमध्ये नाशिक अपर आयुक्तालयातील २५८, ठाणे येथील २७१, अमरावती येथील १५९, तर नागपूर येथील १४८ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी नियुक्ती न देता कला, क्रीडा आणि संगणक शिक्षक पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळविली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पूर्वीच्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानुसार संबंधित ८३६ शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे.