दुष्काळात तेरावा ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचे चटके

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असताना, मराठवाडा विद्यापीठाने या निर्णयाची अंमलबजावणी न करता उलट वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळात  तेरावा ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून  विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचे चटके

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मराठवाड्यावर दुष्काळाचे भीषण संकट असताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Marathwada University) वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीत (Fee hike for students staying in hostels) तब्बल ५० टक्के शुल्कवाढ (50% increase in duty) केली आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेत असताना, मराठवाडा विद्यापीठाने शूलकवाढ केल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या (University Management Council) बैठकीत शुल्क वाढीवर शिक्का मोर्तब करण्यात आला. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून येतात. ऐन दुष्काळात संपूर्ण मराठवाडा होरपळत असताना आता आणखीन या शुल्कवाढीचे चटके विद्यार्थ्यांना सोसावे लागणार आहेत. शुल्क वाढ करण्यासाठी व्यवस्थापन समितीकडून ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाला कोणीही विरोध न केल्याने सर्वानुमते तो मंजूर झाला. मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत असताना, हा निर्णय घेतल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे. एवढा भीषण दुष्काळ माथी आला असताना विद्यापीठाची शुल्कवाढीचा हट्ट कशासाठी? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करत आहेत. 

वसतिगृह विकास समितीची प्र-कुलगुरु डाॅ. वाल्मीक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीला कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर, पदवीधर विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन परिशषदेतील सदस्या डाॅ. योगिता होके पाटील, अॅड. दत्ता भांगे, अधिष्ठाता डाॅ. संजय साळुंके, अधिसभा सदस्य डाॅ. विक्रम खिलारे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. याच बैठकीत ऐन दुष्काळात वसतिगृहांचे शुल्क वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन भीषण दुष्काळात शुल्कवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. 

------------------

 मराठवाड्यातील दुष्काळजन्य भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना असा निर्णय घेणे. हे  काळजाला चटका देणारे आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षणासाठी विद्यापीठात येणारा विद्यार्थी तर दुसरीकडे दुष्काळाचा सामना करणारा त्याचा परिवार;  ही विदारक परिस्थिती या विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? विद्यापीठातील वसतिगृहांची दयनीय अवस्था बदलण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना दिसत नाही. मात्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना वसतिगृह शुल्क वाढवण्याचा निर्णय ताबडतोब घेतला जातो.हे चूकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रीत विद्यापीठ आहे. मात्र विद्यापीठाने वसतिगृह शुल्क वाढ केल्याने असे लक्षात येते की विद्यापीठ हे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी केंद्रित न राहता फक्त वित्त केंद्रित होते की काय ? त्यामुळे वसतिगृहांच्या शुल्क वाढीचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने त्वरित मागे घ्यावा. अन्यथा अभाविपच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.

 - अभिषेक गावडे, अध्यक्ष, अभाविप विद्यापीठ