नवभारत साक्षरता अभियान : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट

नव्या टार्गेटनुसार राज्यातील शिक्षकांना ५ लाख ७३ हजार ३३७ प्रौढ निरक्षरांची नोंदणी करायची आहे.

नवभारत साक्षरता अभियान : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

प्रौढ असाक्षरांच्या (Adult illiterate) पहिल्या परीक्षेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सव्वाचार लाख प्रौढ नागरीक उत्तीर्ण (Four hundred million adult citizens passed) झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना साक्षर असल्याचे प्रमाणपत्र (Literacy certificate) मिळाले आहे. हे निकाल पुढे आले असतानाच आता २०२४-२५ या नव्या वर्षासाठी राज्यभरातील शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट (New target of illiterate enrollment to teachers) ठरवून देण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या नव्या टार्गेटनुसार राज्यातील शिक्षकांना ५ लाख ७३ हजार ३३७ प्रौढ निरक्षरांची नोंदणी करायची आहे. शिवाय जुन्या वर्षातील उर्वरित निरक्षरांसह एकंदर ८ लाख ४ हजार ९९ प्रौढांची यंदा परीक्षा घेण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. त्यामुळे आता मे महिन्यात गुरुजींनी पहिल्या वर्गाचे विद्यार्थी शोधत असतानाच प्रौढ निरक्षरांची नोंदणीही सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

नवभारत साक्षरता अभियान महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात सुरू झाले. पहिल्या वर्षी एकंदर १२ लाख ४० हजार निरक्षरांची नोंदणी करून परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट केंद्राकडून राज्याला देण्यात आले होते. परंतु, ६ लाख ४१ हजार ८१६ निरक्षरांचीच उल्लास ॲपवर नोंदणी होऊ शकली, तर ४ लाख ५९ हजार ५३३ जणांनी १७ मार्च रोजी परीक्षा दिली. त्यातून ४ लाख २५ हजार ९०६ प्रौढ साक्षर म्हणून उत्तीर्ण झाले.

केंद्राकडून राबवण्यात येणारे हे अभियान २०२७ पर्यंत चालू राहाणार आहे. दरवर्षी नोंदणी व परीक्षार्थींचे टार्गेट ठरवून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्य प्रशासनाला काम करावे लागणार आहे. महाराष्ट्रातील मागील वर्षाचा अनुभव पाहता २०२४-२५ या वर्षासाठी नवे टार्गेट देण्यात आले आहे. जुन्या १२ लाख ४० हजारांपैकी उर्वरित असाक्षरांची देखील नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, यंदा ५ लाख ७३ हजार ३३७ असाक्षरांची नोंदणी करणे आवश्यक आहे, तर मागील वर्षी परीक्षेला बसू न शकलेले, उत्तीर्ण होऊ न शकलेले असे असाक्षर मिळून एकंदर ८ लाख ४ हजार ९९ असाक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे.