एनएसएस स्वच्छतेच्या कामा पुरते , आता हे चित्र बदलणार.. 

नएसएसचे विद्यार्थी या पुढील काळात केवळ स्वच्छतेची कामे करताना दिसणार नाहीत तर कौशल्य प्रशिक्षण ,रोजगार निर्मिती , उद्योजकता विकास, कृषीतंत्रज्ञान, संशोधन आदी विषयाचे धडे गिरवताना दिसणार आहेत.

एनएसएस स्वच्छतेच्या कामा पुरते , आता हे चित्र बदलणार.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
 राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस- NSS ) म्हटले की गावात स्वच्छता व श्रमदान करून लहान मोठी विकास कामे करणारे विद्यार्थी असेच  चित्र डोळ्यासमोर उभे राहते.मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) एनएसएस विभागाकडून एनएसएसच्या कार्यप्रणालीत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे एनएसएसचे विद्यार्थी या पुढील काळात केवळ स्वच्छतेची कामे करताना दिसणार नाहीत तर कौशल्य प्रशिक्षण ,रोजगार निर्मिती , उद्योजकता विकास, कृषीतंत्रज्ञान, संशोधन (Skill training, employment generation, entrepreneurship development, agricultural technology, modification ) आदी विषयाचे धडे गिरवताना दिसणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा एनएसएस विभाग लवकरच कात टाकणार आहे.

हेही वाचा : विद्यापीठे, महाविद्यालयांना आता 'ही' माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; वाचा संपूर्ण यादी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविलयातील विद्यार्थी एनएसएसच्या माध्यमातून आपल्या परिसरातील गावात जाऊन श्रमदान करतात.गावातील संस्कृती जाणून घेऊन त्यात समरस होतात.विद्यार्थ्यांमध्ये त्यातून सामाजिक बांधीलकीची भावना निर्माण होते.स्वच्छतेचे महत्त्व पटते.मात्र, केवळ एवढ्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना याबरोबरच स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी लागणारे आवश्यक मार्गदर्शन एनएसएसच्या माध्यमातून दिले जाणार आहे.विद्यापीठातर्फे त्यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला असून विद्यापीठाकडे याबाबत ९५ संलग्न महाविद्यालयांचे प्रस्तावही प्राप्त झाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सदानंद भोसले म्हणाले,विद्यार्थ्यांना श्रमदानाबरोबरच  इतरही महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन मिळणे गरजचे आहे. त्यामुळेच महाविद्यालयांना आता ज्ञान व रोजगार निर्मिती, संशोधन, कृषीतंत्रज्ञान आदी विषयांवरील चर्चासत्र,कार्यशाळा घेण्यासाठी निधी दिला जाणार आहे.महाविद्यालयांच्या परिसरातील उद्योगांना पूरक असणारे कौशल्य विद्यार्थ्यांना दिले जाईल.तसेच संबंधित औद्योगिक कंपन्यांना एनएसएसचे विद्यार्थी प्रत्यक्ष भेट देतील.त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकेल तर काही विद्यार्थी यातून उद्योजक होतील,असा विश्वास व्यक्त करून भोसले म्हणाले, नाशिक जिल्ह्यात वस्त्रोद्योग  व द्राक्ष उत्पादनाशी निगडीत आवश्यक कौशल्य मार्गदर्शन केले जाईल.कृषीतंत्रज्ञान व कृषी पर्यटन या विषयावर चर्चासत्र घेतले जातील.बारामती परिसरात मशरूम व इतर कृषी उद्योग झपाट्याने वाढत आहेत.त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना येथील उद्योगांशी निगडीत प्रशिक्षण देण्यात येईल.