विद्यापीठे, महाविद्यालयांना आता 'ही' माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; वाचा संपूर्ण यादी

विद्यापीठ अनुदान आयोगाने किमान मूलभूत माहितीची यादी तयार केली आहे. अनेक विद्यापीठांच्या वेबसाइटवर संस्थेशी संबंधित किमान माहिती देखील उपलब्ध नाही.

विद्यापीठे, महाविद्यालयांना आता 'ही' माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; वाचा संपूर्ण यादी
University Grant Commission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

काही उच्च शिक्षण संस्था (Higher Education Institutes), विद्यापीठे (Universities) आणि  महाविद्यालये (Colleges) त्यांच्या संस्थेबद्दलची काही मुलभूत माहिती विद्यार्थी आणि पालकांना देत नाहीत. त्यामुळे बऱ्याचवेळा विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अशा गोष्टी टाळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता सर्व विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर काही मूलभूत माहिती प्रकाशित करणे बंधनकारक असेल.

 

संस्थेची माहिती आणि तिची क्रमवारी, अभ्यासक्रम फी कॅलेंडर, वसतिगृह, फेलोशिप शिष्यवृत्ती यांसह विविध योजना व उपक्रमांची माहिती संकेतस्थळावर द्यावी लागणार आहे. याशिवाय ही माहिती वेळोवेळी अपडेट करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने किमान मूलभूत माहितीची यादी तयार केली आहे. एका वृत्त संस्थेशी बोलताना UGC अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप बंधनकारक ; UGC कडून मार्गदर्शक तत्त्वे तयार

 

विद्यार्थी असोत, पालक असोत, संशोधक असोत, सरकारी अधिकारी असोत, माजी विद्यार्थी असोत किंवा इतर कोणताही नागरिक असोत, प्रत्येकाला विद्यापीठे किंवा HEI बद्दल काही मूलभूत माहिती जाणून घ्यायची असते. तथापि, आम्ही असे निरीक्षण केले आहे की अनेक विद्यापीठांच्या वेबसाइटवर संस्थेशी संबंधित किमान माहिती देखील उपलब्ध नाही. अनेक प्रकरणांमध्ये वेबसाइट काम करत नाही किंवा अपडेट केलेली नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांना गैरसोय व अडचणीला सामोरे जावे लागत आहे, असे जगदीश कुमार यांनी सांगितले.

 

आता  आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या तिसऱ्या वर्षात आहोत, अशा वेळी विद्यापीठांनी त्यांच्या वेबसाइटवर मूलभूत माहिती प्रदान करणे आणि वेळोवेळी ती अद्ययावत  करणे आवश्यक आहे. देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, आणि खाजगी विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना त्यांच्या संकेतस्थळावर काही मूलभूत माहिती प्रकाशित करणे आता बंधनकारक असेल. यामध्ये संस्थेची माहिती आणि तिची क्रमवारी, अभ्यासक्रम, फी, कॅलेंडर, वसतिगृह, फेलोशिप, शिष्यवृत्ती, घोषणा यांचा समावेश आहे, असे जगदीश कुमार यांनी सांगितले.

SPPU News : परीक्षा विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष गेले वाया

 

संकेतस्थळावर ही माहिती करावी लागणार प्रसिध्द

 * HEI/विद्यापीठाविषयी - संबंधित कायदे, विकास योजना, वार्षिक अहवाल, संलग्न संस्था/महाविद्यालये, देश आणि परदेशातील कॅम्पस.

* प्रशासन (प्रोफाइल आणि फोटोसह) - विद्यापीठाची रचना, कुलगुरू,  कुलसचिव, वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, मुक्त दक्षता अधिकारी, नेतृत्व (डीन, विभागप्रमुख, विभाग, केंद्रे इ.).

* शैक्षणिक –  कार्यक्रम, दिनदर्शिका, विभाग, शाळा, केंद्र, ग्रंथालय इ.

* प्रवेश आणि फी - प्रॉस्पेक्टस,  प्रवेश नियम, फी, फी परतावा नियम इ.

* संशोधन – R&D सेल, प्रकाशने, पेटंट, विदेशी/उद्योग सहयोग, MOU, इ.

* विद्यार्थी सहाय्य सेवा – वसतिगृह, फेलोशिप, शिष्यवृत्ती, शैक्षणिक क्रेडिट बँक, डिजीलॉकर इ.

* कॅम्पस हार्मनी अँड वेलबीइंग – ई-समाधान, विद्यार्थी तक्रार निवारण समिती, लोकपाल, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, अँटी-रॅगिंग सेल इ.

*  माजी विद्यार्थी संघटना, माजी विद्यार्थी समन्वय कक्ष.

* माहिती कोपरा - आरटीआय, परिपत्रके, सूचना, घोषणा, वृत्तपत्र, बातम्या, ताज्या घटना, उपलब्धी, नोकरीची संधी, आरक्षण रोस्टर इ.

* चित्र गॅलरी

* संपर्क - फोन नंबर, ईमेल, पत्ता.

याशिवाय  संस्थांना त्यांच्या वेबसाइटच्या तळाशी शिक्षण मंत्रालय आणि यूजीसीच्या वेबसाइटच्या लिंक महत्त्वाच्या किंवा इतर संबंधित लिंक आदी माहिती द्यावी लागेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k