ऐन परीक्षेच्या काळात मुंबई शिक्षणाधिकारी तडवी यांचा राजीनामा
सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू असताना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी (माध्यमिक) यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन तेथे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून राजकीय प्रवास सुरू केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) राजकीय वातावरण तापले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील अधिकारी देखील पुढे सरसावले आहेत. सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू असताना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी (Education Officer of Mumbai Municipal Corporation) राजू तडवी (Raju Tadvi) (माध्यमिक) यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन तेथे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून राजकीय प्रवास सुरू केला आहे.
राजू तडवी यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा पालिकेकडे सादर केला असल्याचे सांगण्यात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राजू तठवी यांनी अगोदरच पूर्व तयारी सुरू केली होती. शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचे सूत्र अंतिम होण्यापूर्वी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना चोपडा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर शिवसेना नेते यांच्यामध्ये राजू तडवी यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले.
शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्या राजकीय प्रवेशाने मुंबई महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुंबई महापालिकेत शिक्षणाधिकारी यासारख्या उच्च पदावरील नोकरीचा स्वतःहून राजीनामा देत शिक्षण क्षेत्र सोडून राजकारणात उडी मारण्याचा धाडसी निर्णय राजू तडवी यांनी घेतला आहे. त्यामुळे पालिका अधिकारी वर्गात चर्चेला उधाण आले आहे. राजू तडवी यांनी स्वतःच राजकारणात उठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता राजकीय क्षेत्रात ते किती यशस्वी होतील, ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे, मात्र तत्पूर्वी त्यांचा राजीनामा मंजूर होणे महत्वाचे आहे.