Maharashtra News : महाराष्ट्राला मिळाले पाच नवीन शैक्षणिक चॅनल; टेस्टिंगचे काम सुरू
देशभरात २०० शैक्षणिक चॅनल सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्राचे शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी पुण्यात दिली होती.
राहुल शिंदे
देशात सुरू होत असलेल्या २०० शैक्षणिक चॅनेल (Educational Channel) पैकी महाराष्ट्राला (Maharashtra) पाच चॅनल मिळाले असून त्यातील एका चॅनलच्या टेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २० जुलैपूर्वी इतर चार चॅनेलच्या टेस्टिंग पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील विद्यार्थ्यांना पीएम ई विद्या (PM E Vidya) MH_113, MH_114, MH_115, MH_116 आणि MH_117 या चॅनलवरून विविध विषयांचे ज्ञान दूरचित्रवाणी संचाच्या (TV) माध्यमातून मिळणार आहे. (Maharashtra gets five new educational channels)
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस येत्या २९ जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात २०० शैक्षणिक चॅनल सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्राचे शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी पुण्यात जी- 20 च्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार सध्या शैक्षणिक चॅनलच्या टेस्टिंगचे काम सुरू असून येत्या २० जुलैपर्यंत सर्व चॅनलच्या टेस्टिंगचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २९ जुलै रोजी या चॅनलचे लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न आहे.
मराठी भाषा विद्यापीठाचा आराखडा दोन महिन्यांत; सदानंद मोरे समितीचे अध्यक्ष
देशातील प्रत्येक राज्यात स्थानिक भाषेतील शैक्षणिक चॅनल सुरू केले जात आहेत. महाराष्ट्रातील MH_ 113 या चॅनेल साठी तयार करण्यात आलेला डेटा अपलोड करून त्याची चाचपणी केली जात आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून या सर्व चॅनलचे काम पाहिले जाणार आहे.
महाराष्ट्रात बालचित्रवाणीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यास उपलब्ध होत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी बालचित्रवाणी बंद करण्यात आली. परंतु, आता पुन्हा शैक्षणिक चॅनेल सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयांचे ज्ञान घेता येणार आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
eduvarta@gmail.com