विद्यार्थ्यांनी लिहिले राज्यपालांना पत्र; पुण्यातील शाळा उद्या बंद? 

संस्थांचालक-मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे काढल्या जाणा-या महामोर्चात सर्वच घटक सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी लिहिले राज्यपालांना पत्र; पुण्यातील शाळा उद्या बंद? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

पुण्यातील विविध संघटनांनी शासनाच्या वादग्रस्त निर्णयाविरोधात येत्या १३ ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा (Shaniwar Wada) ते जिल्हाधिकारी (District Collector) कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून पुणे  जिल्ह्यातील सर्व शाळा (Schools in Pune Districts) बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनीही राज्यपालांना याबाबत निषेधाचे पत्र लिहिले आहे. त्यामुळे शुक्रवारी संस्थांचालक-मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे काढल्या जाणा-या महामोर्चात सर्वच घटक सहभागी होणार आहेत. (School Students letter to Governor)

 

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थी राज्यपालांना पत्र लिहिणार आहेत. या पत्रात  "मा. राज्यपाल महोदय , महाराष्ट्र शासन समूह शाळेच्या नावाखाली शाळा बंद करून गोरगरीब, ग्रामीण व आदिवासी भागातील मुला- मुलींचे शिक्षण हिरावून घेत आहे. शाळा दत्तक योजना आणून आमच्यासारख्या बहुजन समाजातील गोरगरीबांचे शिक्षण बंद होणार आहे. शिक्षणाचे खासगीकारण व नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करून आमचे भविष्य धोक्यात येणार आहे. शासनाने काढलेले शासन निर्णय ताबडतोब रद्द करायला लावावेत, ही आम्हा सर्वसामान्यांच्या पोरांची तुम्हाला कळकळीची विनंती " असा आशय आहे.

शाळेजवळच्या पानटपऱ्यांचा मुद्दा तापला; हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्यानंतर आयुक्तांना साकडं

 

समूह शाळा योजना, शाळा दत्तक योजना, शाळांचे खाजगीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण अशा प्रकारचे  शासन निर्णय काढून महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील केवळ शिक्षक-शिक्षकेतर, मुख्याध्याकांनीच  नाही तर संस्थांचालक संघटनांनी सुध्दा या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश खासगी शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी सुध्दा या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थाचालक-मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी केली आहे.

 

विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पोस्ट कार्डाचे वितरण करण्यात आले असून काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्र लहिले आहे. लवकरच ते जमा करून राज्यपालांना पाठवले  जाणार आहेत. त्यामुळे मोर्चात विद्यार्थ्यांपासून संस्थांचालकांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. सकाळी साडे दहा वाजता मोर्चाला सुरूवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वादग्रस्त शासन निर्णयांची होळी केली जाणार आहे.

--------------------

" समूह शाळा , शाळा दत्तक योजना, शाळांचे खाजगीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे वादग्रस्त निर्णय रद्द करावेत,आशा आशयाचे पत्र विद्यार्थी राज्यपालांना लिहिणार आहेत.पाच लाख पत्र राज्यपालांना पाठवण्याचे उद्दिष्ट आहे.त्यातील काही विद्यार्थ्यांनी पत्र लिहिण्यास सुरूवात केली आहे."  
 - नारायण शिंदे , अध्यक्ष , प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k