TAIT परीक्षा घेऊन 80 दिवस झाले,तरी निकाल लागेना; मग ऑनलाइन परीक्षेचा उपयोग काय?
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे महिन्याभरात निकाल जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण होते.मात्र, निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांची शिक्षक भरतीची संधी हुकली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्थात TAIT परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.परीक्षा घेऊन तब्बल 80 दिवसाहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही अद्याप परीक्षेचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. परीक्षेच्या नियोजनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीकडून निकालाचा तपशील देण्यास विलंब होत असल्याने हा निकाल जाहीर करणे शक्य होत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाची भावना आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे 27 मे ते 30 मे आणि 2 जून ते 5 जून या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांपैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेत प्रविष्ट झाले. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे महिन्याभरात निकाल जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण होते.मात्र, निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांची शिक्षक भरतीची संधी हुकली आहे.
शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी TAIT परीक्षेचा निकाल जाहीर होणे गरजेचे होते. परंतु, अंतिम वर्षाच्या डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना TAIT परीक्षा देण्याची उपलब्ध करून देण्यात आली. या विद्यार्थ्यांचा निकाल वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळ्या तारखांना जाहीर केला. त्यामुळे परीक्षेस प्रविष्ट झालेल्या काही मर्यादित विद्यार्थ्यांमुळे सर्वच विद्यार्थ्यांचा निकाल लांबणीवर गेला. दरम्यान,काही दिवसांपूर्वी राज्य परीक्षा परिषदेने निकाला संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले. लवकरच निकाल जाहीर होईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
------------
ऑनलाइन परीक्षा घेऊन उपयोग काय?
राज्य परीक्षा परिषदेने ऑफलाइन पद्धतीने घेतलेल्या TET परीक्षेचा निकाल तीन महिन्यात जाहीर केला. मात्र, ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या TAIT परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुद्धा तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेऊन उपयोग काय? असा सवाल परीक्षार्थी उपस्थित करत आहेत. आत पुढील आठवड्याभरात निकाल जाहीर होईल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.