कुलगुरू पदाची उत्सुकता अधिक ताणली; मंगळवारी होणा-या मुलाखती स्थगित

येत्या १९ डिसेंबर रोजी मुंबई येथे मुलाखती घेतल्या जाणार होत्या.

कुलगुरू पदाची उत्सुकता अधिक ताणली; मंगळवारी होणा-या मुलाखती स्थगित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू (vice chancellor) पदाच्या मुलाखती काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात (postponed) आल्या आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्या अंतिम पाच अंतिम उमेदवारांमधून (Selection of five finalists) एकाची निवड करण्यासाठी येत्या १९ डिसेंबर रोजी मुंबई येथे मुलाखती घेतल्या जाणार होत्या.परंतु, काही दिवसांसाठी त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) डॉ. संजय ढोले आणि डॉ. विलास खरात या दोन उमेदवारांचा अंतिम पाच उमेदवारांच्या यादीत समावेश आहे.तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव आणि प्रा.राजेंद्र काकडे हे अंतिम पाच मध्ये आहेत.येत्या १९ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मुंबई येथे या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या.त्यामुळे कोणाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार याबाबत उत्सुकता होती.पण मुलाखती लांबल्याने ही उत्सुकता आणखी ताणली जाणार आहे.

मुलाखती स्थगित करण्यात आल्या असल्याचे अंतिम पाच मधील एका उमेदवाराने सांगितले.तसेच काही अपरिहार्य कारणास्तव मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या असून केव्हा घेतल्या जाणार हे कळवले नसल्याचेही या उमेदवारांने स्पष्ट केले.

दरम्यान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांच्या निवडीवर उलटसुलट चर्चा झाल्या होत्या. मात्र, तरीही २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ उमेदवारांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले, तसेच डॉ.विलास खरात यांचा समावेश होता. त्यातून डॉ.संजय ढोले व डॉ.विलास खरात यांची अंतिम पाच उमेदवारांच्या यादीत निवड झाली आहे.