सीईटी सेलकडून वेबसाईटमध्ये बदल; आता कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील, तसेच त्याचा नमुना कसा असेल, याची माहिती सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल करण्यात आले आहेत.

सीईटी सेलकडून वेबसाईटमध्ये बदल; आता कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Examination) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. या राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवेळी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ कमी करण्यात आला आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे (Information on available documents) लागतील, तसेच त्याचा नमुना कसा असेल, याची माहिती सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल (New changes to the website) करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रवेशासाठी लागणार्‍या कागदपत्रांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. 

सीईटी सेलमार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते, मात्र, अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची विद्यार्थ्यांना माहिती नसते. तसेच विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र काढतात. मात्र, जात वैधता किंवा नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र लागते, याची माहिती त्यांना नसते. त्यातून ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना घाई करावी लागते अथवा त्यांच्यावर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची वेळ येते. तसेच सीईटी सेललाही विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागते, अशा  परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान देखील सहन करावे लागते, त्याची काळजी घेऊन सीईटी सेलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारा रकाना असणार आहे. त्यामध्ये आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र यांची माहिती त्यात दिसणार आहे. त्यामुळे विद्याथ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल. विद्यार्थ्यांकडे प्रवेशावेळी एखादे कागदपत्रे नसते. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या गोष्टी लक्षात घेता त्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतील. याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी संकेतस्थळावर बदल केले आहेत. विद्यार्थी आतापासूनच कागदपत्रे मिळविण्याची तयारी करतील. त्यातून प्रवेश प्रक्रियेवेळी त्यांना ताण येणार नाही, शिवाय प्रवेश प्रक्रियाही सुरळीत पार पडेल.