हर घर दुर्गा अभियान! ‘आयटीआय’च्या मुलींना मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे..
'हर घर दुर्गा'अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'हर घर दुर्गा'अभियानांतर्गत (Har Ghar Durga campaign) राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण (Self defense training for female students in Government Industrial Institute) वर्षभर देण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.
राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने ‘हर घर दुर्गा अभियान’ सुरू करीत आहोत, असे लोढा यांनी सांगितले.
शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यांसारख्या स्वसंरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी २ तासिका घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून, विद्यार्थिनींना नियमित सराव करता येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या खास तासिकेप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका असावी, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाऊल उचलले आहेत.
eduvarta@gmail.com