पीआरएन अनब्लॉक प्रकरणी ठगांनी उकळले पैसे; विद्यार्थ्यांची आर्थिक लूट 

विद्यापीठाकडून बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाणार होती. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन काहींनी 'तुझा परीक्षा अर्ज भरण्याची व्यवस्था करून देतो', असे म्हणत सत्र पूर्तता संपलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून ३ ते ५ हजार रुपये जमा केल्याचे समोर आले आहे.

पीआरएन अनब्लॉक प्रकरणी ठगांनी उकळले पैसे; विद्यार्थ्यांची आर्थिक लूट 

(राहुल शिंदे )

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) सत्र पूर्तता संपलेल्या व त्यामुमूळे पीआरएन ब्लॉक (PRN BLOCK) झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली.त्यामुळे विद्यापीठाच्या निर्णयामुळे तब्बल ८८ हजार विद्यार्थ्यांना आपली राहिलेली पदवी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. मात्र, काही ठगांनी या संधीचा फायदा घेऊन विद्यापीठाच्या निर्णयाची अपुरी माहिती असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याची (extort money from students) धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाच्या नावावर कोणालाही कानोकान खबर न लागू देता विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली आहे. त्यामुळे या ठगांना शोधून कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने परीक्षेच्या दोन संधी देण्याचा निर्णय घेतला.पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने युजीसीच्या एन प्लस टू या नियमासह एक वर्ष व त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये अंतिम वर्षात आलेले आणि त्यापुढील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता .सध्या सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येत आहे. विद्यापीठाकडून बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाणार होती. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन काहींनी 'तुझा परीक्षा अर्ज भरण्याची व्यवस्था करून देतो', असे म्हणत सत्र पूर्तता संपलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून ३ ते ५ हजार रुपये जमा केल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील काही पुरावे 'एज्युवार्ता' च्या हाती लागले आहेत. 

हेही वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 'एनएसएस'चा विश्वविक्रम; तब्बल १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फीची 'गिनीज'मध्ये नोंद

पीआरएन ब्लॉक संदर्भात फारशी माहिती नसलेल्या विद्यार्थ्यांना टारगेट करण्यात आले.आपल्याला परीक्षेला बसता येईल का ?  याबद्दल अनेक विद्यार्थी अनभिज्ञ होते. आपला परीक्षा अर्ज भरला जावा,  ब्लॉक झालेला पीआरएन नंबर अन ब्लॉक व्हावा, यासाठी विद्यार्थी पैसे मोजायला तयार झाले. त्याच संधीचा फायदा घेऊन काही विद्यार्थ्यांनी  तीन ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने जमा केली.

विद्यापीठ सर्व काही पारदर्शकपणे करत असताना त्याचा काही जण गैरफायदा घेत असल्याचे यामुळे समोर आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात एक कर्मचारी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन प्रमाणपत्र देत असल्याची बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती.विद्यापीठाने त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. विद्यापीठ अशा गैरप्रकारांना थारा देत नाही. मात्र ,आता विद्यार्थीच दुसऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु,सध्या याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसली तरी जी गोष्ट होणारच होती त्यासाठी विना कारण पैसे घेऊन आपली फसवणूक झाली असल्याचे आता काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे. त्यावर काही विद्यार्थी दबक्या आवाजात बोलू लागले आहेत. परंतु, याबाबतची सत्यता तपासल्यानंतर खरच किती जणांची फसवणूक झाली आणि त्यात किती आर्थिक गैरव्यवहार झाला, हे समोर येणार आहे.
-------------------------------------