शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी

कुलगुरू डॉ.शिर्के हे कार्यकाल संपल्यानंतर पायउतार झाले. त्यानंतर वारणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विराजमानही झाले. तरीही शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू मिळाले नव्हते. अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडे कोल्हापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची धुरा सोपविण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर येथील शिवाजी  विद्यापीठाचे कुलगुरू पद रिक्त झाल्यामुळे कोल्हापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार कोणाकडे सोपविणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात चर्चा रंगली होती. अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. येत्या शनिवारी दि .11 ऑक्टोबर रोजी गोसावी हे कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी शिर्के यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला. विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंचा कार्यकाल संपुष्टात येण्यापूर्वीच नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणांमुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. कुलगुरू डॉ.शिर्के हे कार्यकाल संपल्यानंतर पायउतार झाले. त्यानंतर वारणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विराजमानही झाले. तरीही शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू मिळाले नव्हते. अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडे कोल्हापूर विद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

 डॉ.गोसावी यांना या संदर्भात लेखी आदेश प्राप्त झाला असून शक्यतो. येत्या शनिवारीच ते प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

_________________________________________________

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिल्याबद्दल मी  महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती यांचा मनःपूर्वक आभारी आहे. या निर्देशानुसार मी तातडीने कार्यवाही सुरू करत असून, विद्यापीठाचा गौरवशाली वारसा आणि परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी आणि तो अधिक सक्षम करण्यासाठी मी  प्रयत्नशील राहीन.
 डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तथा प्रभारी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,