स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. एम.जी.चासकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. एम.जी.चासकर

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी (Vice-Chancellor Swami Ramanand Tirtha Marathwada University,Nanded) पदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विज्ञान  विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.जी.चासकर (Dr. M.G. chaskar) यांची निवड झाली आहे. राज्यपाल कार्यालयातर्फे डॉ.चासकर यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा शनिवारी सायंकाळी करण्यात आली .लवकरच ते SRTM विद्यापीठाचे नवे कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.जी.चासकर , प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे आणि भौतिक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले यांच्यासह जळगाव येथील डॉ.ए.एम.महाजन आणि नांदेड येथील डॉ.रामचंद्र मंठाळकर यांनी कुलगुरू पदासाठी मुलाखत दिल्या होत्या. त्यामुळे कोणाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार याबाबत मोठी उत्सुकता होती.अखरे डॉ.एम.जी.चासकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

डॉ.एम.जी.चासकर म्हणाले, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाले. विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांना तंत्रज्ञानाशी जोडून त्यांचा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जाईल. शहरी व ग्रामीण भागातील महाविद्यालये,अशी कोणतीही दरी दिसून येणार नाही या दृष्टीने सर्व महाविद्यालये सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असेल.