CBSE 10 वी, 12 वी च्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी मुदतवाढ 

काही शाळांनी मुदत वाढवून देण्याची वारंवार विनंती केल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. 

CBSE 10 वी, 12 वी च्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी  मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी (10th, 12th students) आनंदाची माहिती बोर्डाने दिली आहे.  CBSE ने 10 वी, 12वी च्या प्रॅक्टिकलची (Practical) अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही शाळांनी मुदत वाढवून देण्याची वारंवार विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

CBSE ने इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. याशिवाय, बोर्डाने पोर्टलवर प्रात्यक्षिक, प्रकल्प कामे आणि अंतर्गत गुण अपलोड करण्याची अंतिम तारीख 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, शाळांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, वारंवार स्मरणपत्र देऊनही काही शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षा/प्रकल्पाची कामे/आंतरिक मुल्यांकन/आंतरिक ग्रेड निर्धारित कालमर्यादेत पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता ते यासाठी शाळा मंडळाकडे वेळ मागत आहेत.

सीबीएसईने यावर्षी 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गुण वितरणासह विषयांची यादीही जारी केली आहे. सीबीएसईने एका विषयाला दिलेले जास्तीत जास्त 100 गुण असल्याचे जाहीर केले होते. ज्यामध्ये थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि इंटर्नल असेसमेंटचे गुण असतील.

या विषयी अधिक माहिती देताना प्रियदर्शींनी स्कुलच्या प्राचार्या गायत्री जाधव एज्यूवार्ता शी बोलताना म्हणाल्या, " हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या किंवा इतर काही आत्यावश्यक कारणामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देता येत नाही . तसेच बोर्डाच्या नियमानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी बाह्य परीक्षकांची गरज असते. त्याच्याशिवाय या परीक्षा घेता येत नाहीत. शाळांची संख्या जास्त असून  त्या प्रमाणात बाह्य परीक्षकांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे काही शाळांना प्रॅक्टिकल परीक्षा घेता आल्या नाहीत. अशा शाळांसाठी हा निर्णय चांगला आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे आंतरिक मुल्यांकन काही शाळांचे लांबले आहे. या शाळांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे."