फार्मसीमधील करिअरच्या नव्या वाटा..
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे ६ हजार नवीन स्टार्टअप्स आकार घेत आहेत. या सर्वांचा थेट परिणाम फार्मसी मधील उद्योजकता निर्मितीवर झाला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कोरोनामुळे संपूर्ण जगभरात औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणे पुरण्यात भारताची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे फार्मसी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, हे फार्मसी क्षेत्र नक्की आहे तरी काय? आणि या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कशा मिळतील? त्यासाठी या क्षेत्रातील नक्की कोणते शिक्षण घ्यावे ? याबद्दल आपण या क्षेत्रातील तज्ञ जाणून घेऊयात.
फार्मसीमधील करिअरच्या संधीबाबत 'एज्युवार्ता 'शी बोलताना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फार्मसी प्रिन्सिपल्स अँड कॉलेज ऑर्गनायझेशन (मॅप्को) चे अध्यक्ष डॉ. के एन गुजर म्हणाले, " जागतिक फार्मसी व्यापार $ 1.42 ट्रिलियन आहे. जो भारताच्या GDP च्या जवळपास निम्मा आहे. भारताच्या जागतिक बाजारपेठेतील विशेषत: जेनेरिक औषध उत्पादनांमधील योगदानामुळे या क्षेत्रात भारतासाठी महत्वाचे स्थान निर्माण झाले आहे. भारत सध्या 200 हून अधिक देशांमध्ये निर्यात करतो. यूएस मध्ये जेनेरिकची ४० टक्क्यांपेक्षा अधिक बाजारपेठ भारताची आहे. तर आफ्रिकेतील ५० टक्के आणि एकूण पुरवठ्याच्या २५ टक्के औषधे यूकेला पाठवली जातात, अशाप्रकारे जवळपास ६० टक्के जागतिक जेनेरिक आणि ७० टक्के जागतिक लसी भारतातून पुरवल्या जातात.
डॉ. गुजर म्हणाले, " जागतिक उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तर वैद्यकीय उपकरणाच्या बाजारपेठेत भारताचा क्रमांक पहिल्या २० मध्ये असून आशियात आपण चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या औषध बाजाराची उलाढाल $11 अब्ज आहे. येत्या 2025 पर्यंत ती $ 50 अब्जने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सुमारे ७५० - ८०० उत्पादक कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे ६ हजार नवीन स्टार्टअप्स आकार घेत आहेत. या सर्वांचा थेट परिणाम फार्मसी मधील उद्योजकता निर्मितीवर झाला आहे.
"फार्मसी कोर्सनंतर फार्माकोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, रिसर्च असोसिएट इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत,असे नमूद करून डॉ. गुजर म्हणाले, फार्माकोलॉजिस्ट आणि फार्मासिस्ट हे फार्मसी कोर्सनंतरचे लोकप्रिय जॉब प्रोफाइल आहेत. या नोकरीत सुरुवातीला वर्षाला सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. तर चार वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर प्रतिवर्ष INR ५.५. - ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. याशिवाय क्लिनिकल रिसर्च असोसिएट. फार्मासिस्ट, ड्रग सेफ्टी असोसिएट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मसी बिझनेस, वैज्ञानिक लेखक, पॅथॉलॉजिकल लॅब सायंटिस्ट या क्षेत्रातही नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
गुजर म्हणाले, "महाराष्ट्रात मोठ्या संख्येने फार्मसी अभ्यासक्रमाच्या संस्था आहेत. 200 हुन अधिक डिप्लोमा कोर्स घेणाऱ्या संस्था २६० पेक्षा अधिक पदवी संस्था तर १२५ पेक्षा अधिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता येते. या ठिकाणी बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्मा), मास्टर ऑफ फार्मसी, डॉक्टर ऑफ फार्मसी, एमबीए इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फार्मसी प्रॅक्टिस आणि ड्रग स्टोअर मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फार्मसी प्रॅक्टिस आणि ड्रग स्टोअर मॅनेजमेंट, डिप्लोमा - क्लिनिकल संशोधन, डिप्लोमा - औषध दुकान व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील पदवी आणि अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. इयत्ता बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात ५० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात."