'बीबीए, बीसीए' प्रवेशाच्या तब्बल ६७ टक्के जागा रिक्त

तिसऱ्या फेरीअखेर देखील केवळ ३४ हजार ५२९ जागांवरच प्रवेश होऊ शकले आहेत. त्यामुळे अद्यापही या अभ्यासक्रमाच्या ७३ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांची टक्केवारी जवळपास ६७ % पर्यंत आहे. 

'बीबीए, बीसीए' प्रवेशाच्या तब्बल ६७ टक्के जागा रिक्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या (BBA and BCA Courses) तब्बल ६७ टक्के जागा रिक्त (67 percent seats are vacant) आहेत. त्यामुळे संस्थाचालकांची प्रवेश कोटा पूर्ण करण्यासाठी मोठी तारांबळ उडाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, तिसऱ्या फेरीअखेर देखील केवळ ३४ हजार ५२९ जागांवरच प्रवेश होऊ शकले आहेत. त्यामुळे अद्यापही या अभ्यासक्रमाच्या ७३ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांची टक्केवारी जवळपास ६७ % पर्यंत आहे. 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) या शैक्षणिक वर्षापासून बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमाची नोंदणी आपल्याकडे करणे महाविद्यालयांना बंधनकारक केले आहे. या अभ्यासक्रमांचे प्रवेशही सीईटीद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्यांदाच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याबाबत माहिती नव्हती. अनेक महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमांच्या नावात बदल केला. त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेश प्रक्रिया संस्थास्तरावर राबविण्याची परवानगी सीईटी सेलने दिली आहे. मात्र या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन महाविद्यालयांना घातले आहे. 

राज्यात बीबीए, बीसीए या दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून १ लाख ८ हजार उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी केवळ ४१ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहेत. त्यामध्ये बीबीए १७ हजार १०७ तर बीसीए १७ हजार ४२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. असे असल्याचे एकूण जागांच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा ६७ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.