अनुकंपा नोकरीकरिता बदलता येतो वारसदार ; नागपूर खंडपीठाचा निर्णय
अनुकंपा तत्वावरील नोकरीकरता ४५ वर्षे वयाची मर्यादा ओलांडलेल्या वारसदाराच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराला नोकरीच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अनुकंपा तत्वावरील नोकरीकरता (Compassionate employment) ४५ वर्षे वयाची मर्यादा ओलांडलेल्या वारसदाराच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराला नोकरीच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Bombay High Court Nagpur Bench) एका प्रकरणात दिला आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे कार्यरत वनरक्षक अकबर खान मो. खान पठाण यांचा १२ फेब्रुवारी २०१६ रोजी अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मुलगा मो. जुबेर खान यांचा अनुकंपा नोकरीच्या यादीत समावेश केला गेला होता. परंतु, त्यांना दीर्घ काळ नोकरी देण्यात आली नाही.त्याचे कारण म्हणजे त्यांनी ४५ वर्षे वयाची मर्यादा ओलांडली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला नोकरी मिळण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी अर्ज केला होता. २० मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार तो अर्ज अमान्य करण्यात आला. त्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही.
परिणामी मो. जुबेर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील निर्णयात उच्च न्यायालयाने वरील बाब स्पष्ट करून मो. जुबेर यांच्या मागणीवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश वन विभागाला दिले. त्यामुळे वनरक्षकाच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला.