युवासेना आक्रमक : सीईटी परीक्षांचे निकाल त्वरित जाहीर करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा..
विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांच्या जागा भराव्यात म्हणून सीईटी सेलकडून सीईटी परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करण्यात येत नाही किंवा निकाल लवकर जाहीर झाला, तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत नाही. हे जाणीवपूर्वक खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या फायद्यासाठी करण्यात येते. याचा थेट फायदा खासगी आणि अभिमत विद्यापीठांना होत आहे.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाच्या (CET Cell) माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा (Pre-entrance exam results) घेण्यात येतात. यातील काही अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. हे सर्व निकाल सात दिवसांच्या आत जाहीर (Announce results within seven days) करून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू (Start the admission process) करावी. युवासेनेकडून देण्यात आलेल्या मुदतीत निकाल जाहीर न झाल्यास, विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन सीईटी सेलच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा गर्भित इशाला युवासेनेचे सह-सचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी दिला आहे.
मागील काही दिवसात बीएस्सी नर्सिंग, एलएलबी ५ वर्षे, एमबीए अशा काही अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाले. मात्र, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्याचवेळी अॅग्रीकल्चर, फार्मसी, इंजिनियरिंग, एलएलबी ३ वर्षे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत माहिती नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना, राज्यातील साधारण ५० खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठात प्रवेश घ्यावा, यासाठी खासगी विद्यापीठांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या विद्यापीठांमधून आर्थिक गैरव्यवहार करण्याचा मार्ग अवलंबला जातो.
या विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांच्या जागा भराव्यात म्हणून सीईटी सेलकडून सीईटी परीक्षांचा निकाल लवकर जाहीर करण्यात येत नाही किंवा निकाल लवकर जाहीर झाला, तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत नाही. हे जाणीवपूर्वक खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या फायद्यासाठी करण्यात येते. याचा थेट फायदा खासगी आणि अभिमत विद्यापीठांना होत आहे. अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी आणि पालकांना असते. त्यामुळे ते वैतागून नाईलाजाने खासगी आणि अभिमत विद्यापीठात प्रवेश घेतात. या संपूर्ण प्रकरणात सीईटी सेल आणि खासगी विद्यापीठांचे प्रशासन सामील असल्याने, सीईटी सेलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे सीईटी सेलला विद्यार्थी हिताची काळजी असल्यास, सीईटी परीक्षांचे निकाल पुढील सात दिवसांत प्रसिद्ध करावेत. निकाल मुदतीत जाहीर न झाल्यास, विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन सीईटी सेलच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेनेचे कल्पेश यादव यांनी दिला आहे.
युवासेनेच्या प्रमुख मागण्या -
सीईटी सेलने खासगी विद्यापीठांच्या फायद्यासाठी काम न करता, सामान्य विद्यार्थी आणि पालकांचा विचार करावा. सीईटी सेलने सीईटी परीक्षांचे निकाल सात दिवसात जाहीर करावेत. निकाल जाहीर झालेल्या सीईटी परीक्षांच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी. प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात संपवण्याचे प्रयत्न करावेत, त्यामुळे १ जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू होऊ शकेल. प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची हेल्पलाईन कक्षात नेमणूक करावी.
eduvarta@gmail.com