NCERT कडून नवीन अभ्यासक्रमासोबतच ब्रिज कोर्सची तयारी सुरु

हा ब्रिज कोर्स 25 मार्चपर्यंत एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तयारी केली जात आहे.

NCERT कडून नवीन अभ्यासक्रमासोबतच ब्रिज कोर्सची तयारी सुरु

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जुन्या अभ्यासक्रमातून नवीन अभ्यासक्रमाकडे (New curriculum) वळवण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी इयत्ता 6 वी मधील सर्व विषयांसाठी अभ्यासक्रम ब्रिज कोर्स डेव्हलपमेंट ग्रुप्स (Bridge Course Development Groups) तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती NCERT चे संचालक प्रोफेसर दिनेश प्रसाद सकलानी (Dinesh Prasad Saklani) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

सकलानी यांनी  सांगितले, "नवीन पुस्तकांसोबत ब्रिज कोर्सही तयार केले जात आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या विषयांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जुन्या पॅटर्नमधून बदल करून आता नवीन अभ्यासक्रम शिकविला जाणार असून अभ्यासक्रम बदल योजनेअंतर्गत ब्रिज कोर्सेस तयार केले जात आहेत. हा ब्रिज कोर्स 25 मार्चपर्यंत एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तयारी केली जात आहे." 

सकलानी म्हणाले , "गेल्या वर्षी जुलै 2023 मध्ये इयत्ता 2 पर्यंतची नवीन पाठ्यपुस्तके आली होती आणि यावर्षी 3 री मध्ये येणाऱ्या मुलांना नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. इयत्ता 3 री मधील मुलांना नवीन पुस्तकांचा अभ्यास करताना कोणतीही अडचण येणार नाही कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, इयत्ता 2 ची मुले आधीच नवीन अभ्यासक्रमाच्या आधारावर जारी केलेल्या पुस्तकांमधून अभ्यास करत होती. 

यंदा सहाव्या वर्गात येणारे विद्यार्थी पाचवीतील जुना अभ्यासक्रम आणि पॅटर्नचा अभ्यास करून येतील या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी इयत्ता 6 वी मधील सर्व विषयांसाठी अभ्यासक्रम ब्रिज कोर्स डेव्हलपमेंट ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. 

ब्रिज कोर्ससाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर मुलांना नवीन अभ्यासक्रम आणि पॅटर्नबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. ब्रिज कोर्ससाठी हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू, विज्ञान, सामाजिक शास्त्र, गणित, कला शिक्षण, आरोग्य-शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण या विषयांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.