11th Admission:अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबली; आता 26 मे पासून होणार सुरूवात
राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया काही दिवस पुढे ढकलली असून आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
 
                                एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
11th Admission: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 2025-26 (State Department of School Education) या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया (Class XI Admission Process)ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. मात्र, राज्यभरातील लाखो विद्यार्थी एकच वेळी ऑनलाइन अर्ज भरणार असल्याने त्यासाठी भक्कम तयारी करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने (Department of Secondary Education)अकरावी प्रवेश प्रक्रिया काही दिवस पुढे ढकलली असून आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाईल, याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध केला होता. तसेच 21 मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात 22 मे रोजी सुद्धा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नाही. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर 22 मे रोजी दुपारी चार वाजता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल, असे संकेतस्थळावर दिसून येत आहे. मात्र, संकेतस्थळ चालू नसून केवळ एक ईमेज आपलोड केल्याचे निदर्शनास येत आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड यांसह मुंबई, ठाणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती. परंतु, यंदा ग्रामीण, तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश राबविली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 16 ते 17 लाख विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पसंती क्रमानुसार महाविद्यालय देण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे, ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे 16 मे रोजी तरी प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
                         eduvarta@gmail.com
                                    eduvarta@gmail.com                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                     
            
             
            
            