दिवाळीनंतरही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत; मुख्याध्यापक संघाचे शिक्षण मंत्र्यांना पत्र
एका तालुक्यामध्ये दहापेक्षा कमी कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांना 45 ते 50 किलोमीटर अंतरावर प्रवास करून कॉलेजला जावे लागत आहे. ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
11th admission: अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवल्यानंतर अजूनही अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांना घरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर तर काहींना 45 ते 50 किलोमीटर अंतरावर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन पद्धतीने प्रवेश द्यावेत ,या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले आहे.
राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना जवळचे कॉलेज मिळाले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. ग्रामीण भागातील मुला- मुलींना घरापासून गावापासून लांब असणारे कॉलेज मिळाल्यामुळे विद्यार्थी दररोज कॉलेजला जाऊ शकत नाहीत. एका तालुक्यामध्ये दहापेक्षा कमी कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांना 45 ते 50 किलोमीटर अंतरावर प्रवास करून कॉलेजला जावे लागत आहे. ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला दहा कॉलेज निवडण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, काही तालुक्यामध्ये दहा कॉलेज नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी वारंवार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चकरा मारत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाजवळील जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश ऑफलाइन पद्धतीने करून देण्याची संधी द्यावी. बहुतांश विद्यार्थ्यांची गावे आडवळणी असल्यामुळे त्यांची प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यामुळे अर्धवट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील कॉलेजमध्ये प्रवेश देण्याबद्दल निर्णय घ्यावा,अशी विनंती मुख्याध्यापक महासंघातर्फे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना करण्यात आली आहे.
eduvarta@gmail.com