ZP भरती : शुल्क परतावा मिळण्यात तांत्रिक घोळ, उमेदवार हतबल

आठ अर्ज भरलेल्या उमेदवारांना चारच अर्ज दाखवत आहेत, मोबाईल क्रमांकावर OTP येत नाहीत, अशा अनेक समस्या असल्याचे समितीचे म्हणणे आहे. 

ZP भरती : शुल्क परतावा मिळण्यात तांत्रिक घोळ, उमेदवार हतबल
ZP Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ग्रामविकास विभागाकडून (Rural Devlopment Department) राज्यात २०१९ मध्ये जिल्हा परिषद भरती प्रक्रिया (ZP Recruitment) राबविण्यात आली होती. पण ही प्रक्रिया अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर आता या परीक्षेसाठी भरलेले शुल्क विभागाकडून परत (Fee Reimbursement) केले जात आहे. मात्र, त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जात असून तांत्रिक घोळ दूर करण्याची मागणी होत आहे. (Competitive Examination)

 

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. २०१९ मध्ये निघालेली जिल्हा परिषद भरती रद्द करण्यात आली, त्याचे उमेदवारांकडून घेतलेले करोडो रुपये शुल्क आता परत करण्यात येणार होते. पण शुल्क परत करण्यासाठी बनविलेल्या वेबसाईटवर तांत्रिक समस्या आहेत, उमेदवार रजिस्ट्रेशन करूच शकत नाही, असा दावा समितीने केला आहे.

पुण्यातील कोचिंग क्लासेसवर कारवाई होणार का? दिशाभूल करण्यासाठी चढाओढ

 

आठ अर्ज भरलेल्या उमेदवारांना चारच अर्ज दाखवत आहेत, मोबाईल क्रमांकावर OTP येत नाहीत, अशा अनेक समस्या असल्याचे समितीचे म्हणणे आहे. ग्रामविकास विभागाने वेबसाईट वरील तांत्रिक समस्यांचे तत्काळ निवारण करावे, अन्यथा ज्या जिल्हा परिषदेत अर्ज केला आहे तिथे अर्जाची प्रत दाखवून शुल्क परताव्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. जाहिरातबाज सरकार किती अकार्यक्षम आहे याचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. रद्द करण्यात आलेल्या जिल्हा परिषद भरतीच्या कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी सरकार असमर्थ असल्याचे दिसत आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

 

बेरोजगारी, पेपरफुटी, कंत्राटी भरती, घरची आर्थिक परिस्थिती अश्या अनेक प्रश्नांमुळे तणावात राहणाऱ्या उमेदवारांना स्वतःचे परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी इतका मनस्ताप का सहन करावा लागतो? ग्रामविकास विभागाने वेबसाईट मधील त्रुटी तत्काळ दूर करून उमेदवारांना पैसे परत करावे, किंवा ऑफलाईन पद्धतीने पैसे परत करण्याचा मार्ग निवडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k