UDRF:आता विद्यापीठांतील विभागांचे रँकिंग; शासन निर्णय
राज्यातील विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना मूल्यांकन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा (Academic status of universities) उंचावण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना मूल्यांकन (Ranking of academic departments) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत राज्यातील विद्यापीठे मागे पडली, त्याच एनआयआरएफच्या धर्तीवर हे मुल्यांकन केले जाणार आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला असून त्यानुसार विद्यापीठाच्या विभागांकडून झालेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून विभागाची क्रमवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना आपल्या दर्जात सुधारणा करावी लागणार आहे.
आता उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांतील विभागांचेही मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व अकृषी आणि सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावून संशोधनाला चालना देणे हा यामागे उद्देश आहे. त्यानुसार एनआयआरएफ आणि क्यूएस मूल्यांकनच्या धर्तीवर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटल रँकिंग फ्रेमवर्क (यूडीआरएफ) तयार करण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांतील विभागांचे मुल्याकन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबतचा शासन निर्णय उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी फक्त विद्यापीठ व महाविद्यालयांचे नॅकद्वारा मूल्यांकन केले जात असे. आता विद्यापीठाकडूनच त्यांच्या शैक्षणिक विभागांचे मूल्यांकन केले जाणार आहे. हा उपक्रम दरवर्षी १ जुलै ते ३० जून या शैक्षणिक वर्षातील विभागांच्या शैक्षणिक,संशोधन व इतर कामगिरीच्या आधारित राबविण्यात यावा. या कालावधीत विद्यापीठाच्या विभागांकडून झालेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून विभागाची क्रमवारी जाहीर करण्याची कार्यवाही जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत करण्यात यावी, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
विभागांना मु्ल्यांकन देण्याबाबतच्या उपक्रमाचे परिपत्रक संबंधित विद्यापीठांनी जुलै महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करावे. विभागांनी आवश्यक ती कागदपत्रे दोन आठवड्यांत संबंधित प्रणालीवर अपलोड करावी आणि बाहेरील तज्ज्ञ समितीकडून मूल्यांकन पूर्ण करून घ्यावे. त्यांच्या अहवालानुसार विभागांची क्रमवारी जाहीर करावी. निकषानुसार सर्वोच्च गुण प्राप्त विभागास अनुदान, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करावे. ज्या विभागांना निकषांनुसार कमी गुण प्राप्त झाले आहेत, अशा विभागांना त्यांचे मूल्यांकन उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
विभागांचे असे केले जाणार मुल्यांकन
विद्यापीठांच्या विभागांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी पाच घटक ठरविले आहेत. यामध्ये प्राध्यापकांनी केलेले संशोधन आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी ३०० गुण, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि अध्यापन प्रक्रियेसाठी १०० गुण, प्रशासन आणि विभागीय कार्यप्रणालीसाठी ११० गुण, विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि संधींसाठी १४० गुण, तर कार्यशाळा, संमेलन आणि सहकार्य उपक्रमांसाठी ७५ गुण दिले जाणार आहेत.