PRN च्या नावाखाली विद्यार्थ्यांना हजारो रुपयांना घालतायेत गंडा?
विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या मान्यतेशिवाय पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध होत नाही,असे असताना काही व्यक्ती विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. यापूर्वीही असा प्रकार उघडकीस आला होता. एज्युवार्ताने त्यास वाचा फोडली होती.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पीआरएन ब्लॉग झालेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन काही समाज कंटक परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देतो, असे विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळत आहेत, अशी कुजबूज सध्या विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पीआरएनच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक पिळाणूक होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने या पूर्वीच विद्यार्थ्यांना या संदर्भात सावध राहण्याबाबतच्या सूचना पत्रकाद्वारे दिल्या होत्या. तरीही अनेक विद्यार्थी हे या समाज कंटकांच्या फसवणूकीला बळी पडले आहेत.
विद्यार्थ्यांनी मर्यादीत कालावधीत आपली पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यालाच सत्रपूर्तता कालावधी म्हणतात. मात्र, दिलेल्या कालावधीत पदवी पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांचा पीआरएन क्रमांक विद्यापीठाकडून ब्लॉक केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.त्यासाठी सर्व नियमांचे पालन केले जात असून काही निकष तयार केले आहेत. त्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाते. तसेच विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या मान्यतेशिवाय पीआरएन ब्लॉक झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध होत नाही,असे असताना काही व्यक्ती विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. यापूर्वीही असा प्रकार उघडकीस आला होता. एज्युवार्ताने त्यास वाचा फोडली होती.त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे.
विद्यापीठाने पीआएएन ब्लॉक विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेने विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा ठराव सुमारे महिन्याभारापूर्वी मंजूर केला. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. परंतु, सर्व काही बाबी विद्यापीठाकडून नियमानुसार होणार असताना काही विद्यार्थ्यांकडून एका व्यक्तीने तब्बल 40 हजार रुपये उकळले आहेत. विद्यापीठाने या पूर्वीच पत्रक प्रसिध्द करून विद्यापीठाने कोणत्याही मध्यस्थाची पीआरएन ब्लॉक संदर्भात नियुक्ती केली नसल्याचे जाहीर केले होते. तरीही अनेक विद्यार्थी आर्थिक फसवणूकीला बळी पडले आहेत.
eduvarta@gmail.com