प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य अन् पराक्रमाची अनुभूती
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते ठाकूर अनुप सिंह यांची चित्रपटगृहात अचानक एंट्री झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजी...,हर हर महादेव..., छत्रपती शिवाजी महाराज की जय..., छत्रपती संभाजी महाराज की जय.... अशा घोषणा देत चित्रपटाचा आनंद घेतला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
'प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल'ने (Priyadarshani Group of Schools) शाळेतील विद्यार्थ्यांना शूरवीर, महापराक्रमी, धर्मरक्ष, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' हा चित्रपट (Dharmarakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj Movie) पाहाण्याची संधी उपलब्ध करून दिली. हा चित्रपट पाहून 'प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल'चे विद्यार्थी,पालक भारावून गेले. त्याचवेळी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते ठाकूर अनुप सिंह (Actor Thakur Anup Singh) यांची चित्रपटगृहात अचानक एंट्री झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजी...,हर हर महादेव..., छत्रपती शिवाजी महाराज की जय..., छत्रपती संभाजी महाराज की जय.... अशा घोषणा देत चित्रपटाचा आनंद घेतला.
परदेशातील कल्पनेमधील सुपर हिरोच्या चित्रपटांना गर्दी होते. मात्र,स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात.परंतु,प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.जितेंद्र सिंह, डॉ. राजेंद्र सिंह यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना माहीत व्हावी, या उद्देशाने 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी पुढाकार घेतला. सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रियदर्शनी शाळेतील विद्यार्थी व पालकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी अभिनेता अनुप सिंग यांची अचानक झालेली भेट ही एक पर्वणी ठरली. ठाकूर अनुप सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर चित्रपटही पाहिला. यावेळी चित्रपटांचे निर्माते धर्मेंद्र बोरा, कार्यकारी निर्माते राहूल नेवसे, दिग्दर्शक तुषार शेलार, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. निशा सिंह आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अद्याप एकही स्वतंत्र धडा का नाही ? असा सवाल उपस्थित करून अभिनेते ठाकूर अनुप सिंह म्हणाले, की या चित्रपटासाठी मला विचारणा झाली तेव्हा सुध्दा मला हा प्रश्न पडला होता . मात्र, जेव्हा मी संभाजी महाराज यांच्या विषयी वाचन करण्यास सुरूवात केली. तेव्हा मी अधिक समृद्ध होत गेलो. तसेच मराठी भाषा अधिक चांगल्या प्रकारे बोलायला शिकलो.'प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल'ने विद्यार्थी व पालकांना चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, एनईपी मध्ये इंडियन नॉलेज सिस्टीमला (आकेएस) महत्त्व देण्यात आले आहे. आयकेएस अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची व संस्कृतीची माहिती माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न होता.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आग्रहासत्व अभिनेते ठाकूर अनुप सिंह यांनी चित्रपटातील डायलॉग सादर केले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच उत्साह संचारला.शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अभिनेते अनुप सिंह यांचे औक्षण करून स्वागत केले. प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या सर्व शाखांच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.
________________________________________
मराठी प्रेक्षक दक्षिणेकडील पुष्पा चित्रपट पाहतात.परंतु,आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील चित्रपट पहाण्यासाठी गर्दी होत नाही,याचे मला वाईट वाटले.छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा म्हणून थोडे काही करता यावे,यासाठी प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना व पालकांना 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' हा चित्रपट दाखवला.
- डॉ. जितेंद्र सिंह, व्यवस्थापकीय विश्वस्त, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल