विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

पीडित तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.

विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंजीनिअरिंगचे शिक्षण घेणारी तरुणी तक्रार नोंदवण्यासाठी (Student complains to police) पोलीस स्टेशनला गेली असता, तिच्याकडे तेथील पोलीस अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केली. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara Crime News) लाखनी तालुक्यात घडली आहे. त्यानंतर आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल (Filed a case) करून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.  

तु सुंदर आहेस. आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझी मदत करेन, तु आणि मी क्लोझ फ्रेंड बनू, तू चांगली शिकलेली आहेस. तुझं भविष्य छान आहे. मीही तरुण आहे. तू मला सपोर्ट कर, मी तुला एकटी पडू देणार नाही. आयुष्यभर तुझा सांभाळ करेन, असे म्हणत पीडित तरुणीकडे पोलीस अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आली. 

पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याविरुद्ध भंडारा शहर पोलिस स्टेशनमध्ये पीडित तरुणीला शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे. पीडित तरुणी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अनुसूचित जातीतील आहे.

पीडिता ही इंजीनिअरिंगची स्टूडन्ट असून नागपूर येथे शिक्षण घेत होती. यावेळी ती एका तरुणाच्या संपर्कात आली. तरुणाने तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर तरुणाने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर पीडित तरुणी पोलिसात मदत मागण्यासाठी गेली. मात्र, तिथेही वर्दीतील अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अशोक बागुल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (भादंवि) कलम 354 (अ) (लैंगिक शोषण) आणि 509 (विनयभंगाच्या हेतूने अपशब्द, हावभाव किंवा कृत्ये करणे) एफआयआर नोंदवण्यात आली आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक सुभाष बारसे याप्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.