राज्यातील स्कूल बस दोन दिवस इलेक्शन ड्युटीवर, विद्यार्थ्यांची होणार तारांबळ 

राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता असल्याने या दोन दिवशी बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी घेतला आहे.

राज्यातील  स्कूल बस दोन दिवस इलेक्शन ड्युटीवर, विद्यार्थ्यांची होणार तारांबळ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभ निवडणूक 2024 (Assembly Election 2024) पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता असल्याने या दोन दिवशी बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (School Bus Owners Association of Maharashtra) यांनी घेतला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ होणार आहे. 

राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने शाळांना सुट्टी असली तर १९ तारखेला मात्र नियमित शाळा असणार आहे. त्यामुळे  स्कूल बस अभावी विद्यार्थ्यांना पायपीट करत, अथवा सार्वजनिक बस, रिक्षा, टॅक्सीने शाळेत ये-जा करावी लागणार आहे. मुंबईसह राज्यभरातील मोठ्या शहरांतील हजारो स्कूल बस चालकांसह निवडणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

मतदान यंत्रे, इतर सामान तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी या बसचा वापर करण्यात येणार आहे. या बस १८ नोव्हेंबरलाच रात्रीपासून आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी १९ नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण असल्याने हा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.