रोहित पवारांकडून विद्यार्थ्यांची घोर निराशा ; सिनेट सदस्य असून विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ ? 

रोहित पवार विद्यापीठात येणार असल्याची माहिती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहूल ससाणे, तुकाराम शिंदे, स्टुडेंट हेल्पिंग हॅण्डचे कुलदीप आंबेकर यांनी सांगितली होती. त्यामुळे शहारातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठात आले होते.

रोहित पवारांकडून विद्यार्थ्यांची घोर निराशा ; सिनेट सदस्य असून विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे आणि तरुणांचा आवाज म्हणून गेल्या काही वर्षांपासून अनेक विद्यार्थी संघटना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडे पाहत आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटाचे सदस्यही (Savitribai Phule Pune University C-NET Member) आहेत. संघर्ष यात्रेच्या (Sangharsh Yatra) निमित्ताने रोहित पवार हे विद्यापीठात विद्यार्थ्यांची (STUDENT) भेट घेण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळी ५ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठात गर्दी केली होती.मात्र, रोहित पवार विद्यापीठात फिरकलेच नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली.

हेही वाचा : विद्यापीठाने सोडले विद्यार्थ्यांना वाऱ्यावर ; विद्यार्थ्यांशी निगडित दोन पदांचा घेतला बळी

रोहित पवार विद्यापीठात येणार असल्याची माहिती विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहूल ससाणे, तुकाराम शिंदे, स्टुडेंट हेल्पिंग हॅण्डचे कुलदीप आंबेकर यांनी सांगितली होती. त्यामुळे शहारातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यापीठात आले होते.तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आवारात गर्दी केली होती.विद्यापीठातील काही कर्मचारी सुद्धा रोहित पवार येणार म्हणून आदर्श कँटिन येथे वाट पाहत उभे होते.एकही विद्यार्थी राष्ट्रवादी पक्षाचा किंवा इतर कोणत्या पक्षाचा नव्हता.सर्व अभ्यास व कामधाम सोडून सायंकाळी ५ ते ७  यावेळेत येथे थांबले होते.त्यानंतर शरद पवार गटात असणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका आणि काही कार्यकर्ते येथे आले.

रोहित पवार हे विद्यापीठाचे आधिसभा सदस्य आहेत.मात्र, एकाही अधिसभेच्या बैठकीस ते उपस्थित राहिले नाहीत.येत्या २८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक होणार आहे.या बैठकीस रोहित पवार उपस्थित राहणार आहेत का ? अशी चर्चा विद्यार्थी करताना दिसून आले.विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुऱ्याशा प्रमाणात वसतीगृह उपलब्ध होत नाहीत. जेवणात सातत्याने अळी व झुरळ आढळून येतात.बार्टी ,सारथी आदी संस्थांकडून विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी फेलोशीप उपलब्ध होत नाही,असे अनेक प्रश्न घेऊन विद्यार्थी आले होते.मात्र, रोहित पवार येणार नसल्याचे समजताच विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली.
 तुकाराम शिंदे म्हणाले, विद्यार्थी संघटना व सर्व विद्यार्थ्यांची रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.तसेच येत्या दोन दिवसांत वेळ कळवून भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.काही अपरिहार्य कारणांमुळे विद्यापीठात येऊ शकले नाही.  

---------------
 आपल्या नियोजित कामात व्यस्त असल्याने विद्यापीठात येणे शक्य झाले नाही.त्याबद्दल रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.तसेच लवकरच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडेंट हेल्पिंग हॅण्ड 

-----------------