विद्यापीठाने सोडले विद्यार्थ्यांना वाऱ्यावर ;  विद्यार्थ्यांशी निगडित दोन पदांचा घेतला बळी 

गेल्या काही वर्षांपासून या रिक्त पदांवर नवीन व्यक्तीची पूर्णवेळ नियुक्ती करता येत नसल्याची बाब उघड झाली आहे.

विद्यापीठाने सोडले विद्यार्थ्यांना वाऱ्यावर ;  विद्यार्थ्यांशी निगडित दोन पदांचा घेतला बळी 

(राहुल शिंदे)

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University ) दोन अधिष्ठात्यांच्या (dean) पदांच्या बदल्यात थेट विद्यार्थ्यांशी निगडीत असणाऱ्या  विद्यार्थी विकास मंडळ संचालक (Student Development Board Director )आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक (National Service Scheme Director) या दोन पदाचा बळी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून या रिक्त पदांवर नवीन व्यक्तीची पूर्णवेळ नियुक्ती करता येत नसल्याची बाब उघड झाली आहे.परंतु, विद्यापीठाला झालेली चूक लक्षात आल्यानंतर राज्य शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करून पुन्हा ही पदे पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

हेही वाचा : सध्या नववी, अकरावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; दोनदा देता येणार बोर्डाची परीक्षा
 
नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्यात चार अधिष्ठात्यांची पदे निर्माण करण्यात आली.मात्र, शासनाने अधिष्ठात्यांची केवळ दोन नवीन पदे मंजूर केली.तसेच विद्यापीठाकडे असणारी इतर दोन पदे निरसित करून त्या बदल्यात अधिष्ठात्यांची दोन पदे दर्जोनत (समकक्ष) करण्यात आली. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी विकास मंडळ संचालक आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक ही महत्त्वाची पदे निरसित केली.त्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही निर्णय घेण्यात आला.परंतु, निरसित केलेल्या पदावर पुन्हा पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ही बाब विद्यापीठाच्या लक्षात आली.त्यामुळे आता या दोन पदांएवजी इतर दोन रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.त्यावर शासनाकडून काढलेल्या त्रुटींची पूर्तता करून पुन्हा कागदपत्र शासनास सादर केली आहेत.
  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक पदी डॉ.अभिजीत कुलकर्णी,तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक पदी  डॉ. सदानंद भोसले यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येत नाही.या पदावर अनुदानित पदावरील प्राध्यापक काही वर्षांसाठी कार्यरत नियुक्त केले जातात.अनेक माजी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना ही पदे रद्द काशी झाली यांची माहिती समजू शकली नाही.विद्यार्थ्यांशी निगडीत पदांएवजी इतर पदे रद्द  किंवा कमी करून पुन्हा ही पदे भरण्यास परवानगी मिळावी,असा पत्रव्यवहार शासनाकडे सुरू असल्याचे उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव उघड उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. 
 
 विद्यापीठाची ही पदे रद्द झाली नाहीत,असा दावा विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगितले जात असेल तर रिक्त झालेल्या पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त का झाले नाहीत. तसेच या पदांबाबत विद्यापीठ प्रशासन शासनाकडे पत्रव्यवहार का करत आहे? असा सवाल उपस्थित होतो. 
------------------ 
 विद्यार्थी विकास मंडळ संचालक व राष्ट्रीय सेवा योजना संचालक ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत.ती निरसित करण्याचा प्रश्नच येत नाही.अधिष्ठाता पदासाठी सहाय्यक प्राध्यापकांची दोन पदे शासन आदेशानुसार दर्जोनत केली आहेत.त्यामुळे ही पदे रद्द होण्याचा प्रश्नच येत नाही.  
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे