स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कारवाई 

स्वायत्त महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कारवाई 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University-SPPU) संलग्न असलेली काही महाविद्यालये स्वायत्त (autonomous college) झाली आहेत.मात्र,नियमानुसार  या महाविद्यालयांकडून विद्यापीठाच्या लोगोचा वापर केला जातो.तसेच परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या बाबी विद्यापीठाकडूनच केल्या जातात.त्याचप्रमाणे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात (Maharashtra University of act ) नमूद केलेल्या तरतुदीनुसार या महाविद्यालयांनी विद्यापीठाला निश्चित केलेले शुल्क देणे बंधनकारक आहे.परंतु, स्वायत्त महाविद्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे शुल्क थकवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे शहरातील बहुतांश सर्व नामांकित महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.त्यामुळे या महाविद्यालयांच्या परीक्षा या महाविद्यालय स्तरावर घेतल्या जातात.तसेच विद्यार्थ्यांचे निकालाही महाविद्यालयातर्फेच जाहीर केले जातात. मात्र,महाविद्यालये स्वायत्त झाली तरीही विद्यार्थ्यांचा डेटा विद्यापीठाकडे ठेवावा लागतो. विद्यार्थ्यांच्या पदवीवर विद्यापीठाच लोगो असतो.त्यामुळे नियमानुसार महाविद्यालयांनी विद्यापीठाला शुल्क देणे अपेक्षित आहेत.

हेही वाचा : शिक्षण सेट परीक्षेची तारीख ठरली ; ७ एप्रिलला होणार परीक्षा

काही महाविद्यालयांनी गेल्या दहा वर्षांपासूनचे विविध प्रकारचे शुल्क जमा केले नसल्याचे दिसून येत आहे.तर काही महाविद्यालयांनी नियमानुसार शुल्क विद्यापीठाकडे जमा केले आहे.मात्र, दिवसेंदिवस स्वायत्त महाविद्यालयांची संख्या वाढत चालली आहे.त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या थकीत शुल्काचा आकडा काही कोटींच्या घरात जात आहे. त्यामुळेच विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाला पत्र पाठवून शुल्क भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत.त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली.तसेच शुल्क थकवणा-या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-----------------------------------

"महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाला देय असणारी रक्कम दिलीच पाहिजे.सर्व महाविद्यालयांना याबाबत पत्रही पाठवण्यात आले आहे.संबंधित महाविद्यालयांनी थकीत  शुल्क जमा केले नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला. "
डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषद  सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--------------------------