दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह
राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा (Higher Secondary Certificate i.e. Class XII Examination) 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा (Secondary School Certificate i.e. Class X Examination) 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांना राज्यातून सुमारे 31 लाख विद्यार्थी (students) प्रविष्ट होणार असून या परीक्षेत विविध मार्गाने निष्पन्न होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसवण्यासाठी मंडळाने आगामी फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह (Public awareness week under copy free campaign) आयोजित केला आहे.
हा सप्ताह आयोजित करण्यासंदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यासाठी सूचित करावे, असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. त्याबरोबरच विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेची संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतचे कार्यवाही करण्यात यावी तसेच उपरोक्त प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही गोसावी यांनी दिल्या आहे.
दरम्यान, प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात या जनजागृती सप्ताहात प्रत्येक दिवसाप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीचा तपशील देण्यात आला आहे. त्यात शपथ, कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी आदर्श कार्यपद्धती, परीक्षा सुरू असताना करावयाची कार्यवाही आणि परीक्षेची वेळ संपल्यानंतर करावयाची कार्यवाही याचीही सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे.