शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल यंदा १५ मेपर्यंत जाहीर होणार असल्याची घोषणा मंत्री भुसे यांनी केली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांनी दहावी-बारावीच्या निकालावर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल यंदा १५ मेपर्यंत जाहीर (Results of 10th-12th exams to be declared by May 15) होणार असल्याची घोषणा मंत्री भुसे यांनी केली आहे. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच निकालाची वाट पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे.
दर वर्षीच्या तुलनेत दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा १० ते १५ दिवस अगोदर सुरू होत आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच सीबीएसई माध्यमाचा अभ्यासक्रम लागू करण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे भुसे यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी पुण्यातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर भुसे म्हणाले, राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल यंदा १५ मेपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शिक्षणाच्या पॅटर्नची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२५-२६) केली जाणार आहे. पहिल्या टप्यात केवळ पहिलीच्या वर्गासाठी याची अंमलबजावणी होईल. यानंतर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात टप्याटप्याने सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यामध्ये राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीचा पाठ्यक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधक आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार करण्यात येईल, माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.