पुण्यात बनारस लिट फेस्टिव्हलचे आयोजन ; साहित्य,कला,संस्कृतीची रसिकांना मेजवानी
प्रसिद्ध सिनेकलाकार यशपाल शर्मा या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून बनारस व महाराष्ट्रातील साहित्य कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची सांस्कृतिक राजधानी अशीही ओळख आहे. तसेच काशी, वाराणसी म्हणजेच बनारस या प्राचीन शहराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे.या दोन्ही शहरांचा कला, साहित्य, संस्कृतीचा अभिनव मिलाफ अनुभवण्याची संधी येत्या 21 सप्टेंबर रोजी दर्दी रसिकांना 'बनारस लिट फेस्टिव्हल' च्या (Banaras Leet Festival) माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)संत ज्ञानेश्वर सभागृहात 'प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल'च्या माध्यमातून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सिनेकलाकार यशपाल शर्मा या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून बनारस व महाराष्ट्रातील साहित्य कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
हिंदी पंधरवाड्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे काशी साहित्य कला उत्सव, नवभारत निर्माण समिती आणि पुण्यातील नामांकित 'प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल'च्या वतीने 'बनारस लिट फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये वातायान/ झुळूक या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद,चर्चासत्र, काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते 'बनारस लिट फेस्टिव्हल'चे उद्घाटन होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे विद्यापीठाचे मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.सदानंद भोसले या कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
'बनारस लिट फेस्टिव्हल' या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता यशपाल शर्मा सहभागी होणार असून साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट , नाटक यावर मनोगत व्यक्त करणार आहेत.तसेच मदन मोहन दानिश, सोन रुपा विशाल, स्वयं श्रीवास्तव, असलम हसन, विशाल बाग, दान बहादुर सिंह, प्रशांत सिंह ,अभिषेक तिवारी यांच्यासह विक्रम कर्वे , मकरंद साठे, शशिकांत दूधगावकर, टिकम शेखावत हे संवाद , चर्चासत्र आणि कवी संमेलनात सहभागी होणार आहेत.