आता शाळाही अदानींच्या ताब्यात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
या निर्णयानंतर आता पुढील १५ दिवसात शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घुग्घुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
चंद्रपुर येथील माउंट कार्मेल कॉन्हेंट उच्च माध्यमिक शाळा (Mount Carmel Convent High School Chandrapur) शालेय शिक्षण विभागाकडून (Department of School Education) अदानी समूहाला हस्तांतरीत (School handed over to Adani Group) करण्यात आली असून अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहे.राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने यासंदर्भात नुकताच शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानंतर आता पुढील १५ दिवसात शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घुग्घुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अदानी समूहाने आता चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे.
कार्मेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, असलेली माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा इंग्रजी माध्यमाची स्वयं-वित्तपोषित आहे. यापुर्वीच ही शाळा अदानी फाउंडेशन, अहमदाबाद येथे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. या संदर्भात 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानुसार या शाळेचे व्यवस्थापन अदानी समुहाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळा अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करताना सरकारने काही अटीही घातल्या आहेत, ज्यांचे पालन अदानी फाऊंडेशनला करावे लागणार आहे. यामध्ये मुख्य अट म्हणजे अदानी समूह शाळेतील विद्यार्थी संख्येत कोणताही बदल करू शकत नाही. याशिवाय व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारीही अदानी समूहाची असेल. अदानी यांना येत्या १५ दिवसांत या शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घ्यायचे आहे. व्यवस्थापनाबाबत किंवा भविष्यात नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार आल्यास शाळेचे हस्तांतरण रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत.