पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला जुलै महिन्यातच सुरूवात 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासूनच शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन सुरु केले जाणार आहे.त्यासंदर्भातील प्रस्तावाला  प्राथमिक, माध्यमिक संचालकांनी व परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.                

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेला जुलै महिन्यातच सुरूवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे      

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे (5th, 8th scholarship examination) आयोजन केले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या (scholarship examination) निकालात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या (student ) शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासूनच शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन सुरु केले जाणार आहे.त्यासंदर्भातील प्रस्तावाला  प्राथमिक, माध्यमिक संचालकांनी व परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.                

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी महिन्यात इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.  त्यासाठी तीन महिने आधी म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये  विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जातात. मागील दोन तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा लाखांवरून सहा लाखांपर्यंत खाली आल्याचे दिसून आले आहे. परंतु , शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक, माध्यमिक संचालक कार्यालयासह परीक्षा परिषदेने आता पुढाकार घेतला आहे. हे ही वाचा 

हे ही वाचा :प्रतिनियुक्तीचे तीव्र पडसाद; शिक्षण क्षेत्राला किंमत मोजावी लागणार!

      जुलै महिन्यापासूनच सर्व शाळांमधून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली जाईल. शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळ शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेतील शिक्षकांना पुरेसा अवधी प्राप्त होईल. सध्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधी एक दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज भरता येतो. परंतु, विद्यार्थ्यांची तयारीच नसेल तर केवळ परीक्षा देऊन उपयोग नाही. त्यामुळे पूर्ण मार्गदर्शन करून मगच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता येईल. परिणामी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल,अशी चर्चा शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत झाली.               

 परीक्षा परिषदेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा व तालुक्याचा शिष्यवृत्ती परीक्षे संदर्भातील अभ्यास केला आहे. त्यात गडचिरोली, भंडारा, हिंगोली, चंद्रपूर, परभणी, यवतमाळ आदी जिल्ह्यांचा निकाल पाच ते सात टक्क्यांच्या दरम्यान आहे. इतरही काही जिल्ह्यांचा निकाल आठ ते दहा टक्क्यांदरम्यान आहे. परंतु, या निकालात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळच शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांची तयारी सुरू करण्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिले जाणार आहेत, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-याने  सांगितले.