आता मुलांना प्राथमिक शिक्षण मिळणार मातृभाषेतून; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार 

आदिवासी भाषांसह भारतीय अनुसूचित भाषांमधील 52 लघु पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन केले. भारतीय भाषांमध्ये सुरू करण्यात आलेला हा उपक्रम शालेय शिक्षणासाठी गेम चेंजर असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. 

आता मुलांना प्राथमिक शिक्षण मिळणार मातृभाषेतून; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेत (Primary education in mother tongue) मिळावे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Central Ministry of Education) पुढाकार घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आदिवासी भाषांसह भारतीय अनुसूचित भाषांमधील 52 लघु पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन केले. भारतीय भाषांमध्ये सुरू करण्यात आलेला हा उपक्रम शालेय (School activities) शिक्षणासाठी गेम चेंजर असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. 

शिक्षणाला नवे रूप देण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून  52 भारतीय भाषांमध्ये पुस्तके लाँच करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 17 आदिवासी भाषांचा समावेश आहे. NCERT ने शालेय स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची तयारी केली आहे, त्यासाठी 52 प्राइमर्स लाँच केले आहेत. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर यांच्या सहकार्याने NCERT ने विद्यार्थ्यांसाठी लहान पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले , "हा उपक्रम भारतीय भाषांमधील शिक्षणाला चालना देईल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची संकल्पना साकार करेल आणि शालेय शिक्षणातील बदलाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. हे सर्व भारतीय भाषांना शिक्षणात प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने आहे. राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्र राज्य युनिट्स आणि 200 टीव्ही डीटीएच चॅनेलसह एकत्रित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

" नवीन शैक्षणिक धोरणात इयत्ता आठवीपर्यंत सर्वांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे पाऊल उचलण्यात आले असून त्यावर काम सुरू झाले आहे. या सर्व भाषा अत्यंत मर्यादित भागात बोलल्या जात असल्या तरी, एनसीईआरटीने शालेय स्तरावरही या भाषांमध्ये शिक्षण देण्याची तयारी केली आहे. या संदर्भात 52 भाषांमध्ये तयार केलेली प्रारंभिक पुस्तके लाँच करण्यात आली आहेत, जी लवकरच वाचण्यासाठी दिली जातील," असेही ते म्हणाले.