एनईपीकडे राष्ट्रीय नैतिक कर्तव्य म्हणून बघा ; डॉ. शैलेंद्र देवळणकर यांचे प्रतिपादन

नवीन पिढी अर्थात भारताला घडविण्यासाठी एनईपी आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर

एनईपीकडे राष्ट्रीय नैतिक कर्तव्य म्हणून बघा ; डॉ. शैलेंद्र देवळणकर यांचे प्रतिपादन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy 2020) अनिवार्य असून शंभर टक्के लागू होणार आहे. तरुणांना संपत्ती म्हणून तयार करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आवश्यक असून पुढील काळ शिक्षकांसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय नैतिक कर्तव्य म्हणून याकडे बघा तसेच संपूर्ण देशात महाराष्ट्राचे आदर्श मॉडेल तयार करा,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर (Dr. Shailendra Deolankar) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट २ संपर्क अभियान कार्यशाळा गुरुनानक भवन येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देवळणकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) पासून स्कूल कनेक्ट टप्पा २ ची सुरुवात  करीत असल्याचे सांगितले. 

शैक्षणिक क्षेत्रातील बदलाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. बारावीची परीक्षा झाली असून त्या विद्यार्थ्यांना एनईपीबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात स्कूल कनेक्ट हे अभियान राबविले जात असल्याचे सांगत डॉ. देवळणकर म्हणाले,  बारावीनंतर ४० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात येतात. उर्वरित पदवी, अन्य अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पारंपरिक अभ्यासक्रमाबाबत अनास्था असल्याने काही विद्यार्थी प्रवेशच घेत नसतील. उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची रचना बदलली आहे हे सांगण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास आता कौशल्य, आवडीचे शिक्षण, मेजर- मायनर, ऑन जॉब ट्रेनिंग, विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. एनईपीत रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना हे सांगणे गरजेचे आहे. 

शैक्षणिक क्षेत्रात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्या विद्यापीठांचे स्वायत्त विभाग, स्वायत्त महाविद्यालय तसेच पीजी असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एनईपी लागू करण्यात आली. २०२४-२५ या शैक्षणिक क्षेत्रापासून संपूर्ण राज्यात पदवी अभ्यासक्रमांना एनईपी लागू होईल. त्यामुळे अशा अभिमुकता कार्यशाळांची गरज त्यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण ३४.९ टक्केच असून हे प्रमाण ५० टक्के करावयाचे असल्याने संपूर्ण राज्यात अभियान राबविले जात आहे. एनईपीबाबत सर्वांना माहिती व्हावी म्हणून कार्यबल गट, त्यानंतर ४ समित्या, सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. प्रत्येक महिन्याला बैठकी होत असल्याने राज्यात एनईपी यशस्वीपणे राबविले जात आहे. शासन, विद्यापीठ तसेच महाविद्यालय नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण लागू करण्यासाठी टीमवर्क करीत आहे. महाराष्ट्राच्या या मॉडेलचे दिल्लीत कौतुक होत असल्याचे देवळाणकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, लिटूचे संचालक डॉ. राजू मानकर, नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य यांची उपस्थिती होती. शैक्षणिक क्षेत्रातील बदलाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.