मुंबई विद्यापीठ : पीएच. डी. प्रवेश पूर्व पेट परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाकडून पीएच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ mu.ac.in वर पाहता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून (पेट) परीक्षेच्या निकालाची (PET exam results) वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) 17 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या पीएच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा (Ph. D. Pre-Entrance Examination) (पेट) 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण 5 हजार 40 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी एकूण 3 हजार 794 एवढे विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. यापैकी या परीक्षेत एकूण 2 हजार 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण 53 टक्के आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल लॉगिनमध्ये या परीक्षेचे प्रमाणपत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. विद्यार्थ्याना मिळणारे प्रमाणपत्र हे विशेष फीचर क्यूआर कोडयुक्त असून ऑनलाइन पडताळणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिनांक 17 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी विविध केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्या शाखानिहाय या परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेसाठी सर्वाधिक 921, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी 446, मानव्यविद्या शाखेसाठी 275 आणि आंतरविद्या शाखेसाठी 366 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.