आधूनिक तंत्रज्ञानामूळे हवाई दल झाले गतीशील :  एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमाला संपन्न 

आधूनिक तंत्रज्ञानामूळे हवाई दल झाले गतीशील :  एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

हवाई दलाच्या मानव संसाधन, इंफ्रास्ट्रक्चर, ट्रेनिंग, ऑटोमेशन, क्रिटिकल इंफॉर्मेशन इंफ्रास्ट्रक्चर, नेटवर्किंग या वेगवेगळ्या विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. यामुळे हवाई दल गतीशील झाले आहे.तसेच आत्मनिर्भर भारत अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वार्म ड्रोन बनविण्यात आले आहे. या ड्रोनसाठी हवाई दलाला (Air Force ) आतापर्यंत ८०० कोटींची ऑर्डर आली असून भविष्यात दोन हजार कोटींची ऑर्डर येणार असल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी (Air Chief Marshal V R  Chaudhary) पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएसएम एडीसी यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेत  'भारतीय हवाई दलाचे समकालीन आणि भविष्यातील रेडी एरोस्पेस फोर्समध्ये परिवर्तन' याविषयावर एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर,  प्रभारी कुलसचिव आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते. याप्रसंगी ‘जनरल बी.सी.जोशी मेमोरियल लेक्चर ऑन नॅशनल सिक्योरिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. दिल्लीतील पेंटागॉन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्ताकाचे संपादन माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी केले आहे. 

हेही वाचा : सैन्यदलातील भरतीसाठी मोफत प्रशिक्षण : मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

 एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी, निर्णयप्रक्रियेतील वेळ कमी करण्यासाठी हवाई दलातील विविध विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. हवाई दल आधुनिक करण्यासाठी एआय, ५ जी, मशिन लर्निंग, फोर्थ जनरेशन टेक्नॉलॉजी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत. या सर्वांसाठी एअर फोर्स सायबर ग्रुपही बनवण्यात आला आहे. यावेळी त्यांनी हवाई दलातील विविध विभागाच्या कार्याची माहितीही उपस्थितांना दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे दरवर्षी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. 'गेटवे ऑफ नॉलेज' गेटची स्थापना करणाऱ्या जनरल बी. सी. जोशी यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा वारसा आणि दूरदृष्टींचा सन्मान करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग आणि दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाने १९९५ मध्ये जनरल बी. सी. जोशी यांच्या नावे वार्षिक व्याख्यानमाला सुरू केली होती.