'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज सकाळी ही भेट पार पडली. काल रात्री पुण्यात विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली होती.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज सकाळी ही भेट पार पडली. काल रात्री पुण्यात विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे अर्ध्या तासाची सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या समोरच थेट MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ (Rajanish Sheth) यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
विद्यार्थ्यांवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
__________________________________________
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली. काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
______________________________________________
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही आहे.? या गोष्टीचा जाहीर निषेध..!
रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवारचंद्र) महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष