NEET-UG परीक्षेच्या निकालाबाबत खासदाराची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे चौकशीची मागणी; एनटीएचं विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण

राज्यसभेचे खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET UG 2024 च्या निकालातील कथित अनियमिततेबाबत पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

NEET-UG  परीक्षेच्या निकालाबाबत खासदाराची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे चौकशीची मागणी; एनटीएचं विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या NEET-UG 2024 परीक्षेच्या चर्चेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळ ढवळून निघाले आहे. त्यातच राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या NEET UG 2024 च्या निकालातील कथित अनियमिततेबाबत पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक त्रुटी समोर येत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, " हा विषय लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित आहे आणि जे आरोप समोर येत आहेत,  ते पाहता सीबीआय चौकशी व्हायला हवी. त्यांनी सांगितले की, 67 विद्यार्थ्यांना एकूण 720 गुण कसे मिळू शकतात. हरियाणातील एका परीक्षा केंद्रातून सहा टॉपर्स कसे असू शकतात?  दोन विद्यार्थ्यांना 718 आणि 719 चे गुण कसे असू शकतात? "  

तर दुसरीकडे, NTA ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ज्यामध्ये ग्रेस गुण (Grace marks), OMR शीट (OMR Sheet ), NEET परीक्षा निकाल (NEET Exam Result) इत्यादींशी संबंधित प्रश्नांची उत्तरे लिहली आहेत. याशिवाय एनटीएने आंचल पाल या विद्यार्थिनीचे गुण कमी केल्याच्या व्हायरल व्हिडिओवरही आपली भूमिका मांडली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून एका विद्यार्थ्याची बारावीची गुणपत्रिका व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर दावा केला जात आहे की, त्याला NEET मध्ये 705 गुण मिळाले आहेत. मात्र तो बारावीत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात नापास झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)वरच प्रश्न उपस्थित केले जात आहे की, बारावीत नापास झालेला विद्यार्थी NEET सारख्या कठीण परीक्षेत इतके चांगले गुण कसे मिळवू शकतो. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मार्कशीटबाबत एनटीएचे स्पष्टीकरण समोर आले आहे. एनटीएने म्हटले आहे की,  "जर उमेदवार 12वी उत्तीर्ण झाला नसेल तर तो प्रवेश घेण्यास पात्र राहणार नाही. पात्रतेची अट अशी आहे की उमेदवाराकडे बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका असावी." त्यामुळे साहजिकच त्या विद्यार्थ्यांने NEET परीक्षेत मिळवलेले 705 गुण याचा काहीही उपयोग होणार नाही.