SPPU : शैक्षणिक संस्थांमध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही; रोहित पवारांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

रोहित पवार यांनी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांचीही भेट घेतली आणि कोणताही भेदभाव न करता विद्यापीठातील हा धिंगाणा रोखण्याबाबत त्यांना निवेदन दिलं.

SPPU : शैक्षणिक संस्थांमध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही; रोहित पवारांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विद्यार्थी संघटनांमधील वादामध्ये आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. भाजपाच्या (BJP) आंदोलनानंतर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यापाठोपाठ आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी शनिवारी सायंकाळी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांसह कुलगुरूंची भेट घेत चर्चा केली. (Savitribai Phule Pune University News)

 

रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवैधानिक तत्वांवर विश्वास नसलेल्या काही संघटनांकडून विद्यार्थी-विद्यार्थीनींना मारहाण करुन दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या या गैरकृत्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठातील वातावरण गढूळ आणि दहशतग्रस्त झाले.

विद्यापीठातील वादाला गृहमंत्र्यांचे अभय आहे का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

 

सत्तेच्या आश्रयाखाली शैक्षणिक संस्थांमध्येही सुरु झालेली गुंडगिरी आणि हैदोस कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. यासंदर्भातच विद्यापीठात जाऊन विद्यार्थी-विद्यार्थीनींची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांचीही भेट घेतली आणि कोणताही भेदभाव न करता विद्यापीठातील हा धिंगाणा रोखण्याबाबत त्यांना निवेदन दिलं.

 

सुप्रिया सुळे यांनीही विद्यापीठातील घटनांचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणे सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही. विद्यापीठात भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर  विद्यापीठात आंदोलनला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी", असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k