Breaking News : एमबीएच्या विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा ; लग्न न करण्याचा बॉण्ड, 30 पैकी 29 विद्यार्थ्यांना बोगस कॉलेजने केले नापास

बोगस कॉलेज थाटून केली विद्यार्थ्यांची फसवणूक; विद्यार्थी मारताहेत विद्यापीठ आणि पोलिसांकडे फेऱ्या

Breaking News : एमबीएच्या विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा ; लग्न न करण्याचा बॉण्ड, 30 पैकी 29 विद्यार्थ्यांना बोगस कॉलेजने  केले नापास

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या (Savitribai Phule Pune University) एमबीए (MBA)अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची घोर आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शिवणे येथील एक एमबीए इन्स्टिट्यूट ( MBA institute in Shivane)त्यात सहभागी असून हिंजवडी येथील एका बियर बारच्या समोर बोगस कॉलेज (Bogus College across from Beer Bar) सुरू करून सुमारे 30 विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना गंडा (Students are cheated of lakhs of rupees) घातला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शनिवारी दुपारी विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार सांगितला.सध्या याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात असून शिक्षणाच्या नावाखाली फासावणाऱ्या या महाठगांना लवकरच तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. 

विद्यार्थ्यांनी नियमबाह्य प्रवेश मिळवून देणाऱ्यांपासून सांभाळून राहावे,असे आवाहन शासनातर्फे व विद्यापीठातर्फे वेळोवेळी केले जाते.सीईटी शिवाय विद्यार्थ्यांना कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाता नाही. मात्र, सीईटी शिवाय हिंजवडी येथील बोगस कॉलेजने काही विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश दिला आहे.त्याचाप्रमाणे 30 पैकी 29 विद्यार्थ्यांना इंटरनल एक्झाममध्ये नापास करण्यात आले आहे. एवढेच नाही तर कॉलेजला दोन विद्यार्थी आणून द्या, तरच तुम्हाला पास करतो, असे म्हणत कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात आहे. विद्यार्थ्यांनी एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेताना त्यांच्याकडून दोन वर्ष लग्न करणार नाही,असा अजब बॉण्डही कॉलेजने लिहून घेतला आहे.

शनिवारी दुपारी सुमारे 30 विद्यार्थी विद्यापीठात एकात्र जमा झाले होते.या विद्यार्थ्यांकडून एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तब्बल साडेचार लाख रुपये आकरण्यात आले. मात्र, त्यांचे वर्ग हिंजवडी येथील एका हॉटेल सारख्या खोलीत भरवले जाऊ लागले.ज्या दिवशी त्यांचे पहिल्या सत्राचे परीक्षेचे हॉल तिकीट आले. त्यावेळी त्यांना समजले की आपला परीक्षा अर्ज हा दुसऱ्याच कॉलेजच्या माध्यमातून भरला गेला आहे. संबंधित कॉलेजचे शुल्क हे 65 हजार आहे. मात्र, या विद्यार्थ्यांकडून साडे चार लाख रुपये शुल्क घेतले गेले. जेव्हा शुल्क भरल्याची पावती मागितली तेव्हा या विद्यार्थ्यांना केवळ 65 हजार रुपयांची पावती दिली गेली. त्यानंतर आपली मोठी फसवणूक झाली असल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान कॉलेजमधील प्राचार्य व प्राध्यापक नापास करण्याची धमकी वारंवार देत असल्याचेही काही विद्यार्थी सांगत आहेत.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची भेट घेतली असली तरी त्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.पैसेही गेले आणि वर्षही गेले, अशी आपली स्थिती होऊ नये या भीतीपोटी विद्यार्थी न्याय मागण्यांसाठी विद्यापीठात आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांना गाजा आड कोण करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.