शिक्षकांचे काम वाढले; पालकांकडून चॅनल सब्सक्राइब करून घेण्याची जबाबदारी?

या उपक्रमासाठी राज्य स्तरावर तसेच वाहिनी निहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे. समन्वयक मंडळ प्रक्षेपणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे, वेळापत्रक अद्ययावत ठेवणे आणि कार्यक्रमांची शाळा व पालकांपर्यंत प्रभावी पोहोच घडवून आणणे या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

शिक्षकांचे काम वाढले; पालकांकडून चॅनल  सब्सक्राइब करून घेण्याची जबाबदारी?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत (School Education and Literacy Department) महाराष्ट्र राज्यास एकूण ५ पीएम ई-विद्या (PM eVidya) वाहिन्या उपलब्ध (5 PM E-Vidya channels available) करून देण्यात आल्या आहेत.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (State Council of Educational Research and Training Maharashtra) यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू आले आहे. त्यामुळे शाळा व शिक्षक यांच्यावर हे चॅनल पालकांपर्यंत पोहचवण्याची आणि ते सब्सक्राइब करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत सरकारच्या ‘वन क्लास वन टीव्ही चॅनेल’ या अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या कार्यान्वित (200 educational TV channels launched) करण्यात आल्या आहेत.

इयत्ता १ वी व ६ वीच्या वर्गासाठी पीएम-ई-विद्या ११३ (SCERTM C113), इयत्ता २ री व ७ वी वर्गासाठी पीएम-ई-विद्या ११४ (SCERTM C114), इयत्ता ३ री व ८ वीच्या वर्गासाठी पीएम-ई-विद्या ११५ (SCERTM C115), इयत्ता ४ थी व ९ वीच्या वर्गासाठी पीएम-ई-विद्या  ११६ (SCERTM C116 )आणि इयत्ता ५ वी व १० वी साठी पीएम-ई-विद्या ११७ (SCERTM C117) या वाहिन्यांवर त्यासमोर दिलेल्या इयत्तांसाठी दर्जेदार शैक्षणिक आशयाचे प्रक्षेपण केले जात आहे. या सर्व वाहिन्या डीडी-फ्री डिश व्यतिरिक्त यूट्यूब वर थेट लाईव्ह उपलब्ध असून प्रत्येक वाहिनीवर दररोज सहा तासांचे शैक्षणिक प्रक्षेपण केले जाते. हे कार्यक्रम २४ तासांत तीन वेळा पुनर्प्रक्षेपित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सोयीच्या वेळेस पाहणे शक्य होते.

या उपक्रमासाठी राज्य स्तरावर तसेच वाहिनी निहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे. समन्वयक मंडळ प्रक्षेपणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे, वेळापत्रक अद्ययावत ठेवणे आणि कार्यक्रमांची शाळा व पालकांपर्यंत प्रभावी पोहोच घडवून आणणे या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडून सर्व शिक्षक, अधिकारी तसेच पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, या सर्व शैक्षणिक वाहिन्या यूट्यूब वर सब्स्क्राइब कराव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळेल. या प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक आणि वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक परिषदेच्या संकेतस्थळावर (www.maa.ac.in) पीएम-ई-विद्या वाहिन्या या टॅब अंतर्गत उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीएम-ई-विद्या वाहिन्यांचा उपयोग करण्यासाठी http://www.maa.ac.in/index.php?tcf=pmev या लिंकचा देखील उपयोग करता येईल.